बीड : कोरोना महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी. यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी तसेच येत्या 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


केंद्रीय स्तरावर इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई (JEE) परीक्षा तसेच वैद्यकीय शिक्षणास प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट (NEET) परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या घेणे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरू शकते. या परीक्षेमध्ये राज्यातूनही लाखो विदयार्थी आपले नशीब आजमावणार आहेत. परंतु सध्यस्थितीत ही परीक्षा घेणे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे ही परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्याबाबत आग्रही मागणी करावी, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.





JEE NEET Exam Center List: जेईई-नीट परीक्षांसाठी सेंटर्स वाढवले, राज्यनिहाय सेंटर्सची घोषणा

येत्या 20 सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा (एमपीएससी) लेखी परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. या परीक्षेची तारीख कोरोनामुळे याआधीही बदलण्यात आली आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीतीमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एमपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी, शैक्षणिक साहित्य यांसह इतर बाबींचाही अडचण झालेली आहे, त्यामुळे ही परीक्षा देखील आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.


कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी





एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान जेईई (JEE), नीट (NEET) तसेच एमपीएससी या तीनही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, दळणवळणाच्या बाबतीतील मर्यादा, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करत निर्णय घेण्यात यावा असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


NEET JEE 2020 | मोठा निर्णय... 'नीट, जेईई परीक्षा वेळेतच', परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली