कोल्हापूर : एशियन पेंटने आपल्या जाहिरातीमध्ये कोल्हापूरचा नकारात्मकरीत्या केलेला उल्लेख नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरात एशियन पेंट विरोधात संतापाची लाट आहे. सर्वात आधी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी या जाहिरातीला विरोध करत कोल्हापूरकरांची माफी मागावी अशा पद्धतीची मागणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर एशियन पेंट विरोधात आवाज उठवण्यात आला.


संपूर्ण जगभरातून पर्यटक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्या संस्कृतीमुळे कोल्हापूरने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने चालणाऱ्या या कोल्हापूर नगरीचा एशियन पेंटच्या जाहिरातीमध्ये अपमान करण्यात आला असून ही जाहिरात तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.


आज कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या एशियन पेंटच्या दुकानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काळ फासलं आहे. ही जाहिरात तत्काळ मागे घेतली नाही तर एशियन पेंटचा एक ही डब्बा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकू दिला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे.


जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे?


एशियन पेंटच्या वादात अडकलेल्या जाहिरातीत सिंगापूर आणि कोल्हापूरची तुलना केली आहे. घरातील लहान मुलांमध्ये सिंगापूरला जाण्यासंदर्भात चर्चा सुरू असते. मात्र त्याच वेळी एका मुलाचे वडील घरामध्ये येतात आणि आपण सिंगापूरला नाही ही तर कोल्हापूरला जाणार असा उल्लेख करतात. त्यावेळी वेळ त्या मुलाचे मित्र हेटाळणी केल्यासारखे हावभाव करतात. यालाच कोल्हापूरकरांनी विरोध केला आहे.