बीड : एखाद्या गावच्या विकासकामांसाठी पालकमंत्री म्हणून मी जर ५० किंवा १०० कोटींची घोषणा करत असेल तर तुम्ही आमची औकात काढणार का? असा सवाल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना केला आहे. आमच्या ताईसाहेबांनी माझी औकात काढली. तुम्ही तर पाच वर्ष राज्याच्या सत्तेत होता, केंद्राच्या सत्तेत होता, जिल्ह्याच्या पालकमंत्री होता, तरीसुद्धा विकासासाठी पैस देण्याची औकात तुम्ही का दाखवली नाही असा सवाल धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना  केलाय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी पालकमंत्री, महिला बाल कल्याणमंत्री, जलसंधारणमंत्री अशा तीन चार पदे असलेल्या मंत्र्याचा ३२ हजार मतांनी पराभव करुन माझी औकात दाखवल्याचा टोला देखील धनंजय मुंडेंनी यावेळी पंकजा मुंडेंना लगावला.
 
आष्टी नगपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त आयोजीत केलेल्या प्रचारसभेत धनंजय मुंडे बालत होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. या निवडणुकीमध्ये आष्टीत परिवर्तन निश्चित होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या २५ वर्षात मी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद विधानसभा, लोकसभा या वेगवेगळ्या निवडणुका पाहिल्या. पण आता जी नगपंचायतची निवडणूक चालू आहे, अशी निवडणूक मी कधीच बघितली नसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. देशात शत प्रतिशत भाजप निवडणूक लढते आहे, तर मग आष्टीत तीन ठिकाणी कमळ चिन्हावर निवडणूक का लढवली जात नाही? असा सवालही धनंजय मुंडेंनी केलाय.
 
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचारादरम्यान पाटोदा येथे प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी शंभर कोटींच्या निधी आणण्याची घोषणा केली होती. तर, पाच नगरपंचायतीला पाचशे कोटी निधी आणणार, असे अश्वासन त्यांनी दिले. त्याच्या विधानाचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला होता. सगळे माझ्याच गल्‍ल्यात आले पाहिजे. हे आमदार आणि पालकमंत्री यांचे सुरू आहे. तुम्ही तर 32 नंबरचे मंत्री आहात, असा खोचक टोला पंकजा यांनी लगावला होता. या त्यांच्या टिकेला धनंजय मुंडेनी प्रतिउत्तर दिले आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा भावा-बहिणीचा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: