Shivsena Leader Sanjay Raut  : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपातील राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील वैफल्यग्रस्त झाले आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिआव्हान दिले. 


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.  भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह याच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शाह यांनी खोटं बोलू नये असे राऊत यांनी म्हटले. 


सत्तेसाठी हिंदूत्व सोडले असल्याचे शाह यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी त्याचाही समाचार घेतला. सत्तेसाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा हे सांगणारे कोण होते हे अमित शाह यांनी सांगावे असे प्रतिआव्हान राऊत यांनी दिले. सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती तोडणारे कोण होते, हे त्यांनी स्पष्ट करावे असेही राऊत यांनी म्हटले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैसा, केंद्रीय सत्तेने तयार केलेली कृत्रिम लाटदेखील शिवसेनेला रोखू शकली नसल्याचे राऊत यांनी म्हटले. 


समोरून वार करा


भाजपने सीबीआय, ईडी आणि एनसीबी ही आपली तीन चिलखतं काढावीत आणि लढावे असे प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिले. आम्ही समोरून लढतो, छातीत वार करतो, पाठीत वार करणारे असेही संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे भाजपने आपली चिलखतं काढावीत मग वार करावेत असे आव्हान त्यांनी दिले.