Devendra Fadnavis on Amaravi violence : महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यभरात एकाच दिवशी, 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला.  कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती असेही फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून पोलीस आणि प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही फडणवीसांनी केली. 


अमरावतीसह  राज्यातील इतर ठिकाणी काढण्यात आलेले मोर्चे हे खोट्या माहितीच्या आधारे काढण्यात आले होते. त्रिपुरात जी घटना घडली नाही, त्याचे खोट्या माहितीच्या आधारे भांडवल करण्यात आले. याच खोट्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. राज्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्वनियोजनाशिवाय मोर्चे निघू शकत नाहीत. त्यामुळेच 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चांची चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या सुरू असलेली कारवाई 13 नोव्हेंबरच्या घटनेवर आधारीत होत आहे. पण दंगल घडवण्याच्या हेतूने 12 तारखेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, असा आरोप फडणवीस यांनी केला. 


अमरावतीमधील हिंसाचार ही प्रतिक्रिया


देवेंद्र फडणवीस यांनी 13 नोव्हेंबर रोजी झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया होती असे म्हटले. मात्र, कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही असेही फडणवीस यांनी म्हटले. 
अमरावतीमध्ये 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चाला परवानगी होती का, किती लोकांना परवानगी देण्यात आली, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दंगल भडकवण्यासाठी एका विशिष्ट समुदायाची दुकाने जाळण्यात आली असल्याचे सांगत 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 तारखेची घटना घडली नसती असेही फडणवीसांनी म्हटले. 


भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण


13 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चा प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आली असून त्यांना पोलिसांनी मारहाणही केली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली. खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल तर भाजप कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला. 


यशोमती ठाकूरांचे मौन का?


अमरावतीच्या पालक मंत्री यशोमती ठाकूर 12 नोव्हेंबरच्या घटनेवर का मौन बाळगून आहेत, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने त्या घटनेवर चुप्पी साधली असल्याचे त्यांनी सांगितले. फेक न्यूजच्या आधारे निघालेल्या मोर्चांची चौकशी सरकारने करावी अशी मागणीही त्यांनी केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Amravati Violence : अनिल बोंडेंकडून अमरावती हिंसाचाराचं समर्थन; ऑडिओ क्लिप ट्वीट करत मलिकांचा हल्लाबोल


अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा आरोप


Raza Academy : आझाद मैदान ते अमरावती हिंसाचार, वादात असलेली रझा अकादमी नेमकं करते काय?


 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha