Maharashtra ST bus strike: कार्तिकी यात्रा काळात एसटीचा सुरू असलेल्या संपाचा फटका थेट देवाच्या तिजोरीवर झाला असून यात्रा काळातील उत्पन्नात तब्बल 1 कोटी रुपयांची घट झाली आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा भरावण्यास शासनाने परवानगी दिल्याने यंदा ही यात्रा विक्रमी होईल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, एसटीच्या आंदोलनामुळे सर्व सामान्य वारकरी पंढरपूरमध्ये पोचू शकले नाहीत. याचाच परिणाम पंढरपूर देवस्थानाच्या उत्पन्नावर झाला. दोन वर्षांपूर्वी 2019 साली कार्तिकी यात्रेत 2 कोटी 97 लाख रुपयांचे भरभरून दान मंदिराला मिळाले होते. मात्र, यावेळी भाविक यात्रेला पोचू न शकल्याने यंदा यात्रा कालावधीत जवळपास 3 लाख भाविकांनी दर्शन घेत 1 कोटी 97 लाखाचे दान देवाच्या चरणी अर्पण केले आहे. 


आज गुलाल व बुक्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर कार्तिकी यात्रेची सांगता झाली असे मानले जाते. चारशे वर्षाहून अधिक व काळापासून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. संत नामदेव महाराज यांचे वंशज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज यांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. अख्यायिके नुसार प्रत्यक्ष  विठ्ठलाने संत पांडुरंग महाराज यांना आपल्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या असे मानले जाते. तेव्हापासून महाद्वार काल्याची परंपरा सुरू आहे. 


दरम्यान मागील तीन यात्रेमध्ये मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला पार पडला होता. परंतु, यंदा वारीचे निर्बंध हटवल्यामुळे हजारो भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावली. परंपरेनुसार, काल्याचे मानकरी मदन महाराज हरिदास त्यांच्या मस्तकावर विठ्ठलाच्या पादुका ठेवून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर महाद्वार घाटावरून चंद्रभागा वाळवंट, माहेश्वरी धर्मशाळा, हरिदास वेस या मार्गाने पादुकाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी गुलाल, बुक्का व फुलांची उधळण करीत दर्शन घेतले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha