Nawab Malik on Amaravati riots : अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले. अमरावतीमधील दंगलीसाठी मुंबईतील आमदाराने पैसे पुरवले असल्याचा धक्कादायक आरोपही मलिक यांनी केला.
काही दिवसांपूर्वी मालेगाव, अमरावती, नांदेड येथे त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या विरोधात भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले. या बंद दरम्यान भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात येत होता.
अमरावतीमध्ये झालेला हा हिंसाचार सुनियोजित कट होता. हा कट अनिल बोंडे यांनी आखला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंसाचार घडवून आणण्यासाठी काही तरुणांना पैसे वाटण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही मलिकही यांनी केला. अमरावती येथील हिंसाचार हा दोन गटात झाला नाही. त्याशिवाय या हिंसाचाराचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही, त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे मलिक यांनी म्हटले. मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवक हा एमआयएमचा असून राष्ट्रवादीचा नसल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.
दंगलीसाठी मुंबईतून अमरावतीत पैसे?
अमरावती दंगलीच्या आधी मुंबईतून भाजपच्या आमदाराने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवले होते. त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. मात्र, या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर भाजपने दंगलीचे अस्त्र काढले असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.
अनिल बोंडे यांना अटक
माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना अटक करण्यात आली आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली आहे. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली आहे