मुंबई : पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेली धुसफूस आता मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएस नियुक्तीपर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे. ओएसडी आणि पीएसच्या नेमणुका का होत नाही असा प्रश्न शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलं. अनेक वर्षांपासून सातत्याने ओएसडी आणि पीए म्हणून काम करणाऱ्यांचे संबंध दलालांशी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची शिफारस जरी केली तरी त्यांची नेमणूक मी करणार नाही असं ठामपणे मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याची माहिती आहे.

Continues below advertisement


महायुती सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून नाराज असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यानी पुन्हा एकदा त्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. सरकार सत्तेत येऊन दीड-दोन महिने झाले तरीही मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएच्या नेमणुका का होत नाहीत असा प्रश्न सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.  यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांची धुसफूस बाहेर आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकारी वर्गाला बाहेर ठेवलं आणि चर्चा केली. 


कुठल्याही शिफारशीला बळी पडणार नाही


मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक वर्षांपासून काही अधिकारी ओएसडी आणि पीएसचे काम करतात. त्यांचे दलालांशी संबंध निर्माण झाले आहेत.  त्यामुळे शिफारस झाली तरीही अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार नाही. हे सगळं आपल्यासाठीच गरजेचं आहे. हा निर्णय माझ्यासाठी नाही तर तुमचं सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणूनच मी प्रयत्न करतोय. हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे.


मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएसची नेमणूक करताना अधिकाऱ्यांचे चारित्र्य तपासणार आणि मगच नेमणूक करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याची माहिती आहे. 


दरम्यान, कॅबिनेटमधल्या या चर्चेनंतर काही मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या यादीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तर अद्याप काही मंत्री प्रतीक्षेत आहेत.


शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी कायम?


ओएसडी आणि पीएसच्या नेमणुकीवरून मुख्यमंत्र्यांनी जरी सेनेच्या मंत्र्यांना समजावलं असलं तरी त्यांची नाराजी काही दूर झाली नसल्याची माहिती आहे. 2014 पासून शिवसेनेचे मंत्री त्याच अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत. अशा वेळी आता दुसरे अधिकारी ओएसडी आणि पीएस म्हणून आले तर तो एक प्रकारचा दबाव असेल असं काहींनी खासगीत मत व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्याच अधिकाऱ्यांना ओएसडी आणि पीएस म्हणून नेमण्यात यावे यासाठी शिवसेनेचे मंत्री आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


ही बातमी वाचा: