MLA Abhijeet Patil : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघाकडं सर्वांचच लक्ष लागलं होतं. कारण या मतदारसंघात सलग 30 वर्ष आमदार असणारे बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे (Ranjit Shinde) अपक्ष उभे होते. तर त्यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील (Abhijeet Patil) हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे होते. या निवडणुकीत अभिजीत पाटलांनी बाजी मारली. मात्र, अभिजीत पाटील यांचे राजकीय लॉँचिंग नेमके कसे झाले? आमदार होण्यात कोणाचा सिंहाचा वाटा? याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी कापसेवाडीत द्राक्ष बागातयदार नितीन बापू कापसे यांच्या हुरडा पार्टीसाठी आल्यावर दिली.  


नेमकं काय म्हणाले अभिजीत पाटील?


माढ्याची सुरुवात ही खरी कापसेवाडीतून झाल्याचे आमदार अभिजीत पाटील म्हणाले. पवारसाहेबांच्या हेलीकॉप्टरमधून कापसेवाडीत माझं लॉंचिंग झालं. त्या कापसेवाडीतील लॉंचिंगमुळं आपण सगळ्यांनी मला आमदार केल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. मी आमदार होण्यात प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि कृषीनिष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन बापू कापसेंचा सिंहाचा वाटा असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. सर्वांच्या एकीचं बळ मिळाल्यामुळं 30 वर्षानंतर सत्तांतर झालं आहे. सगळ्यांच्या जुळण्या कशा लावायच्या हे नितीन कापसे यांच्याकडून कोर्स लावून शिकावं लागेल असेही पाटील म्हणाले. नितीन कापसे द्राक्ष बागांचे डॉक्टर आहेत. आता राजकारण कोणता रोग आला की नितीन बापू यांच्याकडून औषध घ्यावे लागत आहे. कारण राजकारणात त्यांचा अभ्यास वाढला आहे. ऑर्गेनिक माणसं देखील राजकारणात आणावी लागतील, त्यातीलच एक नाव म्हणजे निती बापू असेही पाटील म्हणाले. मी अधिवेशनात त्यांनी सांगितलेला द्राक्षाचा प्रश्न मांडला होता. द्राक्ष उत्पादकांची संपूरण् कर्जमाफी करणं गरजेचं असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले.




शरद पवारांच्या समोर अभिजीत पाटलांनी केलं होतं आक्रमक भाषण


विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर माढा तालुक्यातील कापसेवाडीत द्राक्ष उत्पादकांचा  एक शेतकरी मेळावा झाला होता. हा मेळावा कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी घेतला होता. या मेळाव्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आले होते. या कार्यक्रमासाठी शरद पवार बारामतीवरुन हेलिकॉप्टरने आले होते. यावेळी शरद पवार यांच्याबरोबर अभिजीत पाटील हे देखील आले होते. यावेळी अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांच्यासमोर आक्रमक भाषण केलं होतं. तसेच उसाच्या दरावरुन तत्तालिन आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर देखील टीका केली होती. या कार्यक्रमानंतर अभिजीत पाटील यांना माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली होती. याच कार्यक्रमात उसाच्या दरासंदर्भात अभिजीत पाटील यांनी 'धपका' हा शब्द वापरला होता. त्यानंतर सर्वत या शब्दाची चर्चा सुरु झाली होती. 


तुल्यबळ लढतीत अभिजीत पाटलांनी मारली बाजी


माढा विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. अत्यंत तुल्यबळ अशी माढा विधानसभा मतदारसंघाची लढत मानली जात होती. मात्र, अखेर अभिजीत पाटील यांनी 30 हजार मतांनी रणजित शिंदे यांचा पराभव केला. खरं बघितलं तर माढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक होते. यामध्ये अभिजीत पाटील यांच्यासह रणजित शिंदे, नितीन बापू कापसे, मिनलताई साठे, संजयबाबा कोकाटे, शिवाजी कांबळे यांची नावे होते. मात्र, अभिजीत पाटील हे तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर ते चांगल्या मतांनी निवडून देखील आले. मात्र, माढा मतदारसंघाते त्यांचं लॉंचिंग कसं झालं याबाबतची माहिती आणदार अभिजीत पाटीवल यांनी कापसेवाडीच्या हुरडा पार्टीत दिली. 


महत्वाच्या बातम्या:


Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप