मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने आज विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित आमदार (105) आणि भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ नेतेपदी निवडीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 11 आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.


देवेंद्र फडणवीस यांचीच विधीमंडळ नेतेपदी निवड होणार होती. परंतु या निवडीसाठी आज विधीमंडळात औपचारिक बैठक बोलावण्यात आली होती. विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर फडणवीस यांनी सर्व आमदार, भाजप नेते, शिवसेना, रिपाइं यांच्यासह इतर मित्रपक्षांचे आभार मानले.


फडणवीस म्हणाले की, भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोनदा केंद्रात आणि राज्यात सरकार आणलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मोठं कार्य आम्ही करू शकलो. त्यामुळे त्यांचेही आभार.


फडणवीस म्हणाले की, जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे आणि ते लवकरच होणार आहे. कुठल्याही अफवा आणि चर्चांवर विश्वास ठेवायचं कारण नाही. चर्चेशिवाय मजादेखील येत नाही, त्यामुळे चर्चा सुरु राहू द्या, परंतु चिंतेचं कारण नाही.