Nagpur Accident नागपूर: नागपुरात (Nagpur) रविवारच्या मध्यरात्री ज्या ऑडी कारनं दुसऱ्या काही कार आणि दुचाकीला धडक दिली, ती कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत याची होती. याबाबत स्वतः बावनकुळेंनी माहिती देत कबुली दिली आहे. दरम्यान अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होता, हे पोलिसांनीही मान्य केलंय. पोलीस उपायुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत या बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.


दरम्यान, या प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले असतात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरातील हीट अँड रन अपघातप्रकरणी बावनकुळेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नुकतेच नागपूर विमानतळावर आले असता त्यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या आरोपांवरही भाष्य करत अनिल देशमुख यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न अनिल देशमुख करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर कुठलीही चूक नसताना भाजपचे नेते गिरीश महाजन यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न तत्कालीन गृहमंत्र्यांनी केल्याचा आरोपही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी खऱ्या अर्थाने गिरीश महाजन यांची माफी मागितली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


 गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केलाय - देवेंद्र फडणवीस


अनिल देशमुख यांचा केवळ सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न असून याला अजून काहीही संबोधता येतं नाही. राज्यात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हे प्रकरण सीबीआयला दिले होते. या केसमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की,  एसपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने बयान दिला आहे की, अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव टाकलाय, की गिरीश महाजन यांना आरोपी करा. त्यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, किंबहुना त्यांना जीवनातून  उठवण्याचा देखील प्रयत्न त्यात करण्यात आला. यासंबंधीचे सर्व पुरावे एसपींनी सीबीआय कडे दिलेले आहे.


पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या संदर्भातल्या अनेक नोंदी  वरिष्ठांना कळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीबीआयच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. असे असताना त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की, कुठलीही चूक नसताना  गिरीश महाजन यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी सर्वप्रथम माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांची माफी मागितली पाहिजे. अशी मागणीही उपमुख्यमंत्र्‍यांनी केली आहे.


हे ही वाचा