मुंबई : यंदा सरासरापेक्षा जास्त पाऊस पडणार असून त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणांपासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच शेतकऱ्यांना शेतीची सविस्तर माहिती देण्यासाठी महाविस्तार अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असंही मुख्यमंत्री म्हणाले.
CM Devendra Fadnavis PC On Monsoon : काय म्हणाले मुख्यमंत्री?
सरासरीपेक्षा सात ते 17 टक्क्यांपर्यंत जास्त पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच पावसाच्या दोन खंडांमधील अंदाज हा जास्त नसेल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियांचा आणि खतांचा पुरवठा केला जाईल. त्याचा तुटवडा पडणार नाही. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता कुठलं पीक उपयोगी पडेल याचा विचार केला जाणार आहे.
Saathi Portal For Certified Seeds : बियाणांसाठी साथी पोर्टलचा वापर करा
केंद्र सरकारचे साथी या पोर्टलवर बियाणांचे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यावरून त्या बियाणांचे उत्पादन कुठं केलं जातं याची माहिती मिळते. राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणांची विक्री होते. त्यामुळे राज्यात जी बियाणे विकली जातील त्याची साथी पोर्टलवर नोंद करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून त्या बियाणांची विक्री कुठे केली गेली याचा ट्रेस घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यामध्ये बोगसगिरीला आळा घातला जाणार आहे.
खताची लिंकिंग केल्यास कडक कारवाई
खतांच्या लिंकिंगबाबतील कडक निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येक खत विक्री दुकानासमोर त्याचा बोर्ड लावला जाणार आहे. खतं वगैरे या मोठ्या गोष्टी अनुदानावर दिल्या जातात. त्यामुळे कंपन्यांनी लिंकिंग केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
Maharashtra Digital School For Agriculture : प्रत्येक तालुक्यात शेती डिजिटल शाळा
दुर्गम भागात सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यामध्ये कीड व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. यावर्षी डिजिटल शेती शाळा प्रत्येक तालुक्यात आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतातील नव्या पद्धतींवर आणि कीड व्यवस्थापानावर मार्गदर्शन मिळणार आहे.
Mahavistar App : शेतकऱ्यांसाठी महाविस्तार अॅप
महाविस्तार अॅपमध्ये शेतीशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये व्हिडीओही उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये मराठीमध्ये चॅट बॉट उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही माहिती हवी असल्यास ती त्यांना मिळणार आहे.
तसेच शेतकऱ्यांसाठी बँकांकडून सिबिलची मागणी केली जाणार नाही. अशी मागणी करणाऱ्या ब्रँचवर कारवाई केली जाणार आहे.
या खरीप हंगामामध्ये 204 लाख मेट्रिक टनाचे लक्ष्य ठेवलं आहे. चांगला मान्सून झाला तर शेतीची उत्पादकता वाढते. दरवर्षी शेतीमध्ये 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.