जळगाव : "मंडळ आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते. त्यावेळीही भाजपने मंडळ आयोगाला विरोध केला होता. त्यामुळे तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. व्हिपी सिंग यांचा पाठिंबा काढला आणि ते सरकार कोसळलं ते एकाच मुद्यावर कोसळलं होतं, आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. राज्य सरकारने काय केलं आणि राज्य सरकारचीच जबाबदारी होती. तर मग तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले?", असं म्हणत एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 


"2011 रोजी ओबीसींची जातनिहाय गणना झाली, जन गणना केंद्र सरकार करीत असल्याने डाटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. हा डाटा मिळविण्या साठी देवेंद्र फडणीस यांनी मोदी यांना पत्र लिहून मागणी केली आहे, तशीच मागणी पंकजा मुंडे यांनीही केली होती. मात्र दिल्लीत भाजपाच सरकार असताना आणि तुम्ही राज्यात सत्तेत असताना, तुम्हाला केंद्र सरकार डाटा देत नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे, हा सर्व प्रकार खोटारडे पणाचा आहे. या सर्व प्रकाराला तुम्हीच जबाबदार असून तुम्ही ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहात.", असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.


एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले की, "ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. यासाठी ओबीसींची जनगणना कशी करायची? त्यांना आरक्षण कसं मिळवून द्यायचं, त्याची तुम्ही सूचना करा, मात्र तसं न करता तुम्ही म्हणता, मला सत्ता द्या, मग मी तुम्हाला आरक्षण देतो, याचा अर्थ तुम्ही सत्तेसाठी किती हापापले आहेत, हेच या वरून दिसून येतं.", पुढे बोलताना ते म्हणाले की, "ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आता पावले उचलली असून त्यासाठी मागास वर्गीय आयोगाची स्थापना केली आहे. त्यासाठी अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकार ओबीसीची जनगणना करण्यासाठी सूचना करू शकणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. आकडेवारी आली की, काम होणार असले तरी इतके वर्ष वाया गेले आहेत, मागच्या काळातच मोदी यांनी डाटा दिला असता. तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही ओबीसींना आरक्षण मिळू शकले असते. आता जे झालं आहे, ते सुप्रीम कोर्टाने पूर्वी निर्णय दिला आहे. त्या निर्णयाप्रमाणे कारवाई झाली असती तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती. परंतु ओबीसींचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना फेकून द्यायचे, अशी युज अँड थ्रोची भूमिका देवेंद्र फडणीस यांची आहे आणि त्याची अनेक उदाहरणे आपण सांगू शकतो. एकीकडे ओबीसींच्या पाठीशी असल्याचं सांगायचं आणि दुसरीकडे त्यांचे पाय खेचायचे, असा प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नेहमीच पाहायला मिळाला आहे. ओबीसींना आरक्षण मिळण्यासंदर्भात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणीस आणि भाजप हेच जबाबदार आहेत." असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला आहे.  


"देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ओबीसी आरक्षण संदर्भात संन्यास घेण्याची भाषा केली आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे की, "देवेंद्र फडणवीस यांनी संन्यास घेण्याच्या भाषा अगोदर ही केल्या आहेत. विदर्भाचं आंदोलन सुरु असताना त्यांनी त्यावेळी म्हटलं होत की, विदर्भ जर वेगळा झाला नाही तर तर आपण लग्न करणार नाही. पण विदर्भ काही वेगळा झाला नाही, मात्र देवेंद्र फडणीस यांनी लग्न केलं. मुलगीही झाली, तरी त्यांनी आपल आश्वासन पूर्ण केले नाही. त्यानंतरचा विचार केला तर राष्ट्रवादी पक्षाशी युती कधीही करणार नसल्याचं म्हटलं होतं, अगदी वेळ आलीच तर अविवाहित राहणं पसंत करेल, मात्र राष्ट्रवादिशी कधीही युती करणार नाही, असं ते म्हणाले होते. मात्र याच लबादाने सकाळी पाच वाजता युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आता ओबीसी आरक्षण प्रश्नावर ही ते सत्तेच्या लालचेपोटीच राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा करीत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी यांनी तत्व सोडली आहेत. विश्वा मित्राचा पवित्रा दाखवत आहेत.", असा आरोपही एकनाथ खडसे यांनी करीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.


पुढे बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे की, "भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणीस यांचं नेतृत्व उदयास आले तेव्हापासून ओबीसी नेत्यांवर अन्याय्य सत्र सुरु झाले. कोणीही ओबीसी नेता आपल्याला डोईजड होऊ नये यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, त्याच उत्तम उदाहरण माझं स्वतःचं आहे. काहीही कारण नसताना माझ्या विरोधात अनेक चौकशा लावण्यात आल्या, ओबीसी नेत्यांना छळ करण्याचा हा प्रयत्न आहे, कशासाठी  बावनकुळे आणि आमच्या सारख्या नेत्यांची तिकिटे कापली. ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला सारलं, पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी यांनीच प्रयत्न केले. माझ्या मुलीच्या पराभवसाठीही कोणी प्रयत्न केले हे जगजाहीर आहे. एकीकडे तिकीट द्यायचं आणि त्यांनीच पराभवासाठी प्रयत्न करायचे, अशी यांची निती आहे. कशासाठी आमचा वारंवार छळ केला. ओबीसी हा यांच्यासाठी केवळ वापर करण्याचं साधन आहे."


दरम्यान, "केळी पीक विमा प्रश्नावर श्रेय घेण्यावरून खासदार रक्षा खडसे आणि पालकमंत्री यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. गुलाबराव पाटील हे आपल्याला वडिलांच्या जागी आहेत. त्यांनी मुलीच्या कामाचं कौतुक केले पाहिजे", अशी भूमिका रक्षा खडसे यांनी व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मुलीन वडिलांच्या आज्ञेत रहावं, असा उपरोधिक सल्ला दिला होता. या विषयावर एकनाथ खडसे यांनी हा त्या दोन्ही नेत्यांचा प्रश्न आहे. त्यात आपण बोलणार नसल्याचं सांगत, दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :