कोल्हापूर : माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, मी मॅनेज होईन का? असा परखड सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी टीकाकारांना उद्देशून उपस्थित केलाय. ते कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी संवाद साधताना बोलत होते. नाशिकमधील मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला 21 दिवसांची मुदत दिलीय. संभाजीराजे यांच्या भूमिकेवर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याला संभाजीराजांनी प्रतिप्रश्न करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 


राज्य सरकार सोबत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती त्यांनी आज कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांना दिली. यावेळी बोलताना त्यांनी आपली ही उद्विग्नता व्यक्त केली आहे. आंदोलने करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र जे लोक ठोक मोर्चाची भाषा करत आहेत त्यांनी आधी लक्षात घेतले पाहिजे की त्याचे काय परिणाम होतील. कोरोनाचे संकट आहे, कोल्हापूरकरांनी हे संकट आणखी वाढवलं हा ठपका आपल्यावर बसेल. आणि म्हणूनच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही निर्णय घेत आहोत.


सरकारने 21 दिवसात निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल : संभाजीराजे


संभाजीराजे छत्रपती यांनी विनायक मेटे यांच्या टीकेला देखील उत्तर दिलं आहे. संभाजीराजे यांच्या मागण्या संपूर्ण राज्यासाठी आहेत. सारथी संस्थेचं उपकेंद्र केवळ कोल्हापुरात नाही,  तर आठ ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे शिव-शाहू यांचे विचार हे केवळ कोल्हापूर पुरते मर्यादित नाहीत, संपूर्ण देशभर आहेत, असं प्रत्युत्तर विनायक मेटे यांना संभाजीराजेंनी दिलं आहे.


सारथीची बैठक समाधानकारक, 12 महत्वाच्या मागण्या मान्य केल्याची संभाजीराजे छत्रपतींची माहिती


कोल्हापुरातील मूक आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे आणि समन्वयकांना भेटीसाठी बोलावले होते. या भेटीमध्ये नेमकं काय झालं? सरकारसमोर कोणत्या मागण्या ठेवण्यात आल्या होत्या? आणि त्याच्यानंतर सरकारने काय निर्णय घेतले? याची माहिती संभाजीराजे यांनी कोल्हापूरकरांच्या समोर ठेवली आहे. अशाच पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सकल मराठा समाजाच्या समन्वयकांशी संभाजीराजे भेटून बैठकीतील माहिती देणार आहेत. यावेळी संभाजीराजे यांनी सरकारने तातडीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे.