याउलट 2014 ला सत्ता स्थापन करताना देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी केंद्रातील नेत्यांसह राज्यातील भाजप कोअर कमिटीची टीम खंबीरपणे उभी होती. यामध्ये शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार कायम आघाडीवर असायचे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि वेळप्रसंगी नितीन गडकरी आपले संबंध वापरून मातोश्रीची नाराजी दूर करण्यासाठी पुढे सरसवायचे.
मात्र सध्यपरिस्थितीत चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार सोडल्यास यापैकी एकही जण फडणवीस यांच्या टीम मध्ये राहिलेले नाहीत. काहींचा निवडणुकीत पत्ता कट झाला, तर काहींचा पराभव. नितीन गडकरींना तर राज्याच्या राजकारणात काहीच स्थान नसल्याचं सध्या चित्र आहे.
दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी थेट मतोश्रीचे दार ठोठावून एका बैठकीत वाटाघाटी पूर्ण केल्या. कारण प्रश्न होता मोदींच्या प्रतिष्ठेचा. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीसाठी केंद्रातूनही पुढाकार घेतला जात नसल्याचं चित्र आहे.
त्यामुळे एकेकाळी राज्यातील प्रत्येक नेत्याची बलस्थानं वापरून शिवसेनेशी विविध पातळीवर वाटाघाटी करणाऱ्या भाजपात सध्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेच्या रोषाला एकट्याला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे.
यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, सत्तासंघर्ष संवाद बंद झाल्यामुळे चिघळला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांना सांगण्यात आलं आहे की ठरविक लोकच याविषयावर भाष्य करतील. भाजपच्या वतीने केवळ मुख्यमंत्री स्तरावरच चर्चा होईल असं ठरलेलं दिसत आहे. कारण भाजपचे इतर नेते युती होणार, आमची चर्चा सुरु आहे, असं सांगत आहेत मात्र ती कुठल्या लेव्हलला सुरु आहे या संदर्भात कुठलाही स्पष्टीकरण येत नाही. केंद्रातील नेतेही यामध्ये बोलताना दिसत नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री एकटे पडले असले असे चित्र असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. हा भाजपच्या स्टॅटर्जीचा भाग आहे. यामध्ये कोण प्रथम माघार घेणार किंवा कोण संवादासाठी पुढाकार घेणार हे महत्वाचं आहे, असेही देशपांडे म्हणाले.