बीड : गेवराई तालुक्यातील सिंदफना नदीत एक एटीएम सापडले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. हे एटीएम गॅस कटर ने कापलेल्या अवस्थेत आढळले आहे. नदीपात्रातील गाळात अडकलेले हे एटीएम क्रेनच्या सहाय्याने पोलिसांनी बाहेर काढले.


चोरांनी एटीएम चोरुन ते गॅस कटरने कापले असावे. त्यातील पैसे घेऊन एटीएमची विल्हेवाट लावण्यासाठी ते नदीत फेकले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी जालना येथील एक एटीएम लंपास झाले होते, ते हेच एटीएम आहे का? याची खातरजमा सध्या जालना पोलीस करत आहेत.

सिंदफणा नदीत पोहणाऱ्या गावकऱ्यांना नदीच्या तळाला तिजोरी सदृश्य मोठी वस्तू गाळात अडकल्याचे दिसले. नदीचे पाणी ओसरल्यामुळे ती वस्तू नजरेस पडली.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात अशी माहिती मिळाली आहे की, बीड जिल्ह्यातून कोणतेही एटीएम चोरी झालेले नाही मात्र, जालना शहरातून दिवाळीत एटीएम चोरी झाल्याची घटना घडलेली आहे. हे एटीएम जालन्यातीलच असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.