मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देणार असल्याचा पुनरूच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं आहे. तसेच राम मंदिराच्या निर्मितीने देशात नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राम मंदिरामुळे नव्या अध्यायाची सुरूवात (Devendra Fadanvis On Ram Mandir)
22 जानेवारी करता आदेशाची आवश्यकता नाही, इतका प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे. हा उत्साह अक्षरक्षः ओसांडून वाहत आहे, कारण जवळपास 500 ते 600 वर्ष जो संघर्ष चालला, त्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलल्ला हे त्यांच्या प्रत्यक्ष जन्मस्थानी स्थापित होत आहेत. मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल. एक आत्मनिर्भर, आत्मअभिमानी असा स्वाभिमानी भारत आपल्याला त्या दिवसापासून निश्चितच पहायला मिळेल. म्हणून आम्ही सगळे देखील अत्यंत उत्कंठेने त्या दिवसाची वाट पाहत आहोत.
सुनील केदार यांची आमदारकी रद्द ही कायद्याप्रमाणे
सुनिल केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नियमानुसार जेव्हा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होते, त्यावेळी ती शिक्षा लागू झाल्यापासून ती आमदारकी रद्द होते असा कायदा आहे. जर या आदेशाला स्थगिती मिळाली तर आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते. त्यामुळे त्यात काही वेगळे होण्याचे कारण नाही. त्यामुळे जे काही होईल ते कायद्याप्रमाणे होईल.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या धक्का न लावता मराठा आरक्षण देणार
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, हे सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करत आहे. मुख्यमंत्री हे स्वतः या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून आहेत. आज राज्य मागास आयोगाने वेगाने काम सुरू केलं आहे. शिंदे समितीने दुसरा अहवाल सादर केला असून तिसरा अहवाल ही लवकरच अपेक्षित आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन नोंदी या हैदराबादमधून आम्ही प्राप्त करून घेत आहोत. राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे राज्य सरकार योग्य काम करत आहे, हे लक्षात आल्यानंतर तसा निर्णय तो घेणार नाहीत.
आम्ही पूर्ण शक्तीने हे सगळं काम करत आहोत, कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्यवाही हे राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे असं फडणवीस म्हणाले.
संजय राऊत रोज नवनवीन आरोप करतात. त्यामुळे त्यांच्या आरोपाला उत्तर देणं एवढा माझा स्तर खाली गेलेला नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
विरोधकांची आघाडी ही स्वार्थाकरता
विरोधकांची इंडिया आघाडी ही स्वार्थाकरता असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडी ही कुठलीही आघाडी नाही, ज्या लोकांना असं वाटतं की मोदीजींमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचं दुकान आणि त्यांच्या परिवारवादाचं दुकान बंद होणार आहे, अशी लोकं एकत्र आली आहेत. त्यामुळे स्वार्थाकरता जे एकत्र येतात, ते स्वार्था करताच विघटित होतात. स्वार्थाकरता त्यांचं विघटन रोज आपल्याला पाहायला मिळेल.
ही बातमी वाचा: