मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त आहे, या सरकारने विदेशी दारूवरचा कर कमी केला पण वीजबील माफ केलं नाही असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते गडचिरोली येथे बोलत होते. 


राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाविकास आघाडीने कोरोनाकाळात दारु सोडून कुणालाच मदत नाही.  या सरकारने विदेशी दारुवरचा कर कमी केला पण शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं नाही. धान उत्पादकांना 100 ते 150 कोटी रुपयांचा बोनस हे सरकार  देऊ शकलं नाही.


कोरोना काळात यशवंत जाधव यांनी 400 कोटींची संपत्ती कमावली. त्यांना भ्रष्टाचारातील फक्त 10 टक्के मिळाले, बाकी 90 टक्के कुठे गेले? असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. 


गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणारे सरकार जनतेला काय न्याय देणार? असा सवाल विचारत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात धान्य राज्य सरकारला दिलं होतं. पण मोदींचे नाव होईल म्हणून या सरकारने ते धान्य गोदामात सडवलं पण गरिबांपर्यंत पोहोचवलं नाही. ठाकरे सरकार गरिबांचा विचार करणार नसेल तर मोदी सरकार ही भूमिका बजावेल." 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आले, ते आता लोकांनाही धोका देत आहे. सामान्यांना धोका देणाऱ्या सरकारला वठणीवर आणणार. 2024 साली राज्यात भाजप एकहाती सत्ता प्राप्त करणार."


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha