नवी दिल्ली : पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने आणि रसायने क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे 2021-22 या आर्थिक वर्षात भारताच्या वस्तूंची निर्यात 418 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी आर्थिक वर्ष 2021-22 चे व्यापार आकडे जाहीर करताना ही माहिती दिली. या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये देशाने 40 अब्ज डॉलरची निर्यात केली, जी एका महिन्यातील निर्यातीची सर्वोच्च पातळी आहे. यापूर्वी, मार्च 2021 मध्ये, निर्यातीचा आकडा $ 34 अब्ज होता.


आयात $610 अब्ज डॉलर


सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2021-22 या वर्षात भारताचा कमोडिटी व्यापार (निर्यात आणि आयात) एक ट्रिलियन डॉलर्स ओलांडला आहे कारण देशाची आयात देखील $610 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताने 292 अब्ज डॉलरची निर्यात केली. 2021-22 मध्ये निर्यातीचा आकडा मोठ्या वाढीसह 418 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या 23 मार्च रोजी देशाने 400 अब्ज डॉलरचा निर्यातीचा आकडा पार केला होता.






 


सर्वाधिक निर्यात 'या' देशांत


या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला सर्वाधिक निर्यात केली, त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई), चीन, बांगलादेश आणि नेदरलँड्स देशाचा क्रमांक लागतो. पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे.


"चालू आर्थिक वर्षात भारतातून वस्तूंची निर्यात $ 417.8 अब्ज वर पोहोचली आहे. या आकडेवारीत नॉन-ईडीआय बंदरांच्या निर्यातीच्या आकडेवारीचा समावेश नाही आणि निर्यातीचा संपूर्ण आकडा $ 418 अब्ज पार केला आहे जे अपेक्षित लक्ष्य होतं ते भारताच्या निर्यात इतिहासातील सर्वकालीन उच्चांकी ठरलं आहे" असं गोयल यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं. निर्यातदार आणि उद्योग संघटनांचे प्रयत्न, विविध विभागांमधील समन्वय आणि राज्य सरकारांचे प्रयत्न या यशासाठी कारणीभूत ठरले आहेत.


विकसित देशांना निर्यातीत वाढ


एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत निर्यातीमध्ये नोंदवलेल्या या सकारात्मक वाढीमध्ये पेट्रोलियम, सूती धागे आणि कपडे, हातमाग, रत्ने आणि दागिने, अभियांत्रिकी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, चामडे, रसायने, प्लास्टिक आणि सागरी उत्पादने यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


विशेषतः विकसित देशांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड महामारीच्या लाटांमध्ये उभ्या राहिलेल्या आव्हानांना न जुमानता भारताची कमोडिटी निर्यात कामगिरी खूप चांगली आहे. या आर्थिक वर्षाच्या सर्व 12 महिन्यांत निर्यात $30 अब्जांपेक्षा जास्त झाली आहे.समीक्षाधीन कालावधीत कृषी उत्पादनांची निर्यात $48 अब्ज झाली अशी माहिती गोयल यांनी दिली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha