Maharashtra Revenue Workers Strike : मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी आजपासून राज्यातील तब्बल 22 हजार महसूल कर्मचाऱ्यांनी (Revenue Workers Strike) बेमुदत संप पुकारला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे राज्यातील कामकाजावर परिणाम झाला आहे. 


नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करावे. महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादित पार पाडावी. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4600 रुपये करावा. 27 नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी. प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी या मागण्यांसाठी आज राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूलच्या 22 हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ज्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात ओस पडलेली पाहायला मिळत आहेत. 


नेमक्या मागण्या काय आहेत...


महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी
अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून, दोन वर्षांपासून थांबलेली नायब तहसीलदार पदोन्नती करावी
नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करावे. 
प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे
पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी 


मागील अनेक दिवसांपासून रिक्त पदाची भरती करण्याची मागणी होत आहे, तर ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध होत नसल्याने दोन वर्षांपासून नायब तहसीलदारांना पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 28 मार्चला महसूल कर्मचाऱ्यांनी लाक्षणीय उपोषण करून देखील शासनाने दखल न घेतल्याने , आजपासून राज्यभर महसूल कर्मचारी संपावर गेलेत...या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, महसूल विभागाचे काम ठप्प झाले आहे...दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 




या आंदोलनात सहभागी कर्मचारी 
नायब तहसीलदार 
अव्वल कारकून 
महसूल सहाय्यक 
वाहन चालक 
शिपाई 
कोतवाल 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha