kisan exhibition pune 2022 : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन (Kisan Exhibition) हे 14 ते 18 डिसेंबर पुण्यात (Pune) होणार आहे. यात शेतकऱ्यांचा मेळा बघायला मिळणार आहे. पुण्यातील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र भोसरीजवळ मोशी येथे हे प्रदर्शन भरणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) उत्साहाचं वातावरण आहे. याच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास सवलत देण्यात आली आहे. 


दीड लाखांहून अधिक शेतकरी


15 एकर या प्रदर्शनाचा परिसर असणार आहे. यात 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं सादर करणार आहेत. प्रदर्शनात 5 दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा किसान प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.


किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग आणि सहकार्य लाभणार आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका आणि शेती लघु उद्योग अशी विभागवार दालनं उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. शेतीसाठी लागणारी यंत्रे आणि उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत असणार आहे.


पाणी नियोजनाचं तंत्रज्ञान मुख्य आकर्षण


पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणाऱ्या 80 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे. मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन विचार आणि उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील.


पूर्वनोंदणी कशी करायची?


प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रु.150/- आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा किसान मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. ABP माझाच्या दर्शकांनी A60 हे कुपन वापरुन तिकीट काढल्यास शेतकऱ्यांचे तिकिटामागे 60 रुपये वाचणार आहेत. त्याचबरोबर या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी तिकीटांसाठीचा शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे.