मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना ही सत्तेतल्या तिन्ही पक्षांत तिसऱ्या स्थानी आहे. अगदी काँग्रेसनंही शिवसेनेला मागे टाकलं आहे. तर अर्थ खातं असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपुत्र असूनही आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्यालाही मोठा फटका बसलाय. पर्यावरण खात्याकडे 420 कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त 3 टक्के म्हणजे 14 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खात्याचीच ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या इतर मंत्र्यांबद्द्ल न बोलणंच योग्य ठरेल.
2020 ते 21 या वर्षातील निधीवाटपाची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक आमदारसंख्या असणाऱ्या आणि मुख्यमंत्रीपद असणारा शिवसेना पक्ष मात्र यात पिछाडीवर दिसतोय. त्यामुळे किमान समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण निधीवाटपात मात्र समानता दिसत नाही.
महाविकास आघाडी सरकारमध्ये नंबर दोन वर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र अव्वल ठरली आहे आणि ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे ती शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर आहे. निधी मिळवण्यात आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे.
पक्षनिहाय निधी
शिवसेना 56 आमदार
निधी 52255 कोटी
काँग्रेस 43 आमदार
निधी 100024 कोटी
राष्ट्रवादी काँग्रेस 53 आमदार
निधी 224411 कोटी
हे आकडे आहेत 2020-21 या वर्षात तिन्ही पक्षाकडे असलेल्या खात्यासाठी मिळालेल्या निधीचे. ज्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. ज्या शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे आकड्यांच्या खेळात नंबर दोन वर असलेली राष्ट्रवादी पार्टी निधी मिळवण्यात मात्र सर्वात अव्वल ठरली आहे. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळाला. तर निधी पदरात पाडून घेण्यात काँग्रेसनही शिवसेनेला मागे टाकलं आहे.
पक्ष केलेली तरतूद खर्च (कोटी)
राष्ट्रवादी 2353 49 224411
काँग्रेस 105985 100024
शिवसेना 66549 52255
विशेष म्हणजे निधी वाटपाचा फटका आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे. पर्यावरण विभागात एकूण 420 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली त्यापैकी फक्त तीन टक्के रक्कम म्हणजे 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
किमान समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. पण निधी वितरणाच्या या कड्यावर नजर टाकली तर निधी वाटपात मात्र समानता दिसत नाही. यात सर्वाधिक कोंडी शिवसेनेची होत आहे. शरद पवार यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्यामुळे तीन पक्षांना एकत्रित घेऊन सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा करून घेतल्याचे दिसते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं उघड
- Mhada Paper Leak issue : 'घरातली वस्तू कधी मिळणार', म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्डचा वापर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha