Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister of Maharashtra Ajit Pawar) यांनी आज मास्क काढून भाषण केलं अन् सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. तिथं कार्यक्रमात भाषण करण्यासाठी ते उभे राहिले. तेव्हा मास्क काढून भाषण करण्याचा आग्रह उपस्थितांनी केला. तेव्हा मराठवाडा आपली सासरवाडी असल्यानं मास्क काढून बोलतो, अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली. आणि चक्क दादांनी मास्कशिवाय भाषण केलं. मास्कसाठी आग्रही असणाऱ्या अजित पवारांनी मास्कशिवाय भाषण केल्यानं सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळं चर्चेत असतात. त्यांची स्टाईल असो किंवा आपल्या भाषणातून त्यांनी केलेली टोलेबाजी. त्यांचे पहाटेचे दौरे असोत वा त्यांची कडक शिस्त. दादांच्या चर्चा नेहमीच होत असता. आज अजित पवार त्यांनी मास्क काढून केलेल्या भाषणामुळे चर्चेत आहेत.
सध्या राज्य सरकारनं राज्यातील सर्व कोरोना निर्बंध मागे घेतले आहेत. तसेच, तब्बल दोन वर्षांनी राज्य मास्कमुक्त झाला आहे. राज्यभरातील जनतेनं सुटकेचा निश्वास सोडला. पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मास्क वापरण्याच्या नियमांमध्ये शिथीलता देण्यात आल्यानंतरही कायम मास्क वापरताना दिसत होते. पत्रकार परिषद असो किंवा माध्यम प्रतिनिधींशी साधलेल्या संवादात. मंत्रिमंडळाची बैठक असो किंवा अधिवेशन अजित पवारांनी मास्क वापरणं काही सोडलं नाही. पण आज बीडमधील भाषणात अजित पवारांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला.
पाहा व्हिडीओ : मी ऐकत नाही पण मराठवाडा सासरवाडी आहे म्हणून ऐकावं लागतं : अजित पवार
बीड दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री भाषणासाठी मास्क घालूनच उभे राहिले. मात्र उपस्थितांनी मास्क काढून भाषण करण्याचा त्यांना आग्रह केला. अजित पवारांनी क्षणार्धातच उपस्थितांचा मान ठेवत मास्क काढून भाषणाला सुरुवात केली. पण अशी संधी सोडतील ते अजित पवार कसले. मराठवाडा आपली सासरवाडी असल्यानं मास्क काढून बोलतो, असं म्हणत त्यांनी मिश्किल वक्तव्य केलं अन् उपस्थितांचा एकच हशा पिकला.
काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला. तरी पण आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. पहिली लाट, दुसरी लाट आपण पाहिली आहे. अशा लाट पुन्हा येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. तसेच, कोरोना काळातही अजित पवार कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. एकदा पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री असलेले अजित पवार पोहोचले. आढावा घेतल्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या भोवती गोळा झाले. पण माध्यमांशी बोलण्यापूर्वी अजित पवारांनी त्यांच्याजवळची सॅनिटायझरची बाटली काढली आणि माध्यम प्रतिनिधींच्या बूमवर फवारली. अजित पवारांनी बूमवर अचानकपणे केलेल्या फवारणीमुळे उपस्थितांना देखील धक्का बसला आणि आणि सर्वांना हसूही आवरता आलं नाही. अजित पवारांच्या या कृतीच्याही चर्चा त्यावेळी माध्यमांसोबतच राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.