Ajit Pawar : राज्यातील वातावरण गढूळ करण्याचं काम सध्या सुरु आहे. या परिस्थितीबाबत सर्वजण बोलले आहेत. गुढीपाडव्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून जाती-जातीत भांडणं लावण्याचं काम सध्या सुरू आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काय झालं हे राज्याने पाहिलं आहे. जाती-जातीत आणि धर्मा-धर्मांत वाद लावण्याचं काम सुरू केलं आहे. परंतु, जाती-जातींमध्ये भांडणे लावणाऱ्यांना कोल्हापूरच्या निवडणुकीतून चांगली चपराक बसली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे. राष्ट्रवादीच्या कोल्हापूर येथील संकल्प सभेत अजित पवार बोलत होते.
राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील संकल्प सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच नेते उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, "कोरोनानंतर आता परिस्थिती सुधारत आहे. कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले, अनेकांचे व्यवसाय गेले, आम्ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, आता आपल्याला काळजी घ्यायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारने अडीच वर्षात काय केलं हे जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम केलं पाहिजे. जनतेसाठी हे सरकार स्थापन केलं आहे याचा विसर पडता कामा नये."
ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी निर्णय येईल. कोर्टाने लगेच निवडणुका घेण्याचे आदेश दिले तर त्यासाठी तयार असलं पाहिजे. आगामी निवडणुकीत तरुणाईला संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
"महागाई आणि नोकरीच्या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना काळजीपूर्वक बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे कोणता समाज दुखावणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला.
राज ठाकरेंची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी : छगन भुजबळ
"कोल्हापुरात काही मंडळींनी धार्मिक चिखल उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोल्हापूरच्या जनतेने पुन्हा महाराष्ट्राला मार्ग दाखवला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारच राज्याला तारू शकतात. महागाई वाढली आहे. परंतु, याकडं कुणी लक्ष देत नाहीत. महाराष्ट्रातील उद्योग संपवण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु, महाराष्ट्र हाच भारताचा आधार आहे. आम्ही बोललो की कारवाई केली जाते, पण आम्ही घाबरणार नाही बोलत राहणार. राज ठाकरे यांचं आज वेगळंच चाललंय, त्यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालीय, अशी टीका राष्ट्रवादेचे नेते छगन भुजबळ यांनी केली.
शरद पवार खंबीर आहेत तोपर्यंत या सरकारला कोणताही धक्का बसणार नाही : एकनाथ खडसे
"महागाईच्या मुद्द्यावरून आता केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. केवळ निवेदने देऊन चालणार नाही. फोन टॅप करणे यासारखी नीच कामं राज्यात पाहिलं नाहीत. शरद पवार खंबीर आहेत तोपर्यंत या सरकारला कोणताही धक्का बसणार नाही. सत्ता मिळत नाही तोपर्यंत भाजपची ही नौटंकी चालूच राहणार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर केली आहे.
जातीवर आणि धर्मावर लढून पोटाचा प्रश्न सुटणार नाही : अमोल कोल्हे
"पोटनिवडणुकीत कोल्हापूरच्या मातीनं दाखवून दिलं की विखारी विचारांना इथं थारा नाही. कोल्हापूरकरांचं ठरलेलं असतं खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. सत्तेसाठी कोणतीही गोष्ट करण्यास मागेपुढे पाहिलं जातं नाही हे आज चित्र आहे. देशासमोरच्या प्रश्नांवरून लक्ष बाजूला वळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला तुम्ही धर्म शिकवता काय? जातीवर आणि धर्मावर लढून पोटाचा प्रश्न सुटणार नाही, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले.