बीड : 'अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात. त्यामुळे आपल्याला कामकाज करता यावे यासाठी रिव्हॉल्व्हर देण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने बीडच्या (Beed) जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. 


सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार कोकणे यांची नियुक्ती झाली आहे. कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 


"देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी कारभार असून धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून मंजूर घेतली जातात असे कोकणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता यावे यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावा" अशी मागणी कार्यकारी अभियंता कोकणे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


"मी जॉईन झाल्यानंतर लगेच ही मागणी केली होती. माझ्यासोबत असा कुठलाही प्रकार झालेला नाही, मात्र यापूर्वीच्या येथील कामाचा आढावा घेतला त्यावेळी मला येथे अशा प्रकारे लोक बिले वसूल करतात. अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे मी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी दिली आहे. 


दरम्यान, संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर देण्यात यावा अशी सरकारी अधिकाऱ्याने मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधिकाऱ्याच्या या  अजब मागणीमुळे बीड जिल्ह्यासह परिसरात एकच खळबल उडाली आहे. परिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची  गंभीर दखल घेतली असून पुढे या प्रकरणावर काय निर्णय होईल याकडे परिसरातील अधिकाऱ्यांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे. 


महत्वाच्या बातम्या