मुंबई : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव म्हणाले, राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. दरम्यान या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केलं असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Blast near Israeli Embassy Update: दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट
इस्त्रायली दूतावासापासून 150 मीटर अंतरावर एक गाडी उभी होती आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 वाजून 45 मिनिटांनी हा आईईडी स्फोट झाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 एपीजे अब्दुल कलाम रोडवरील जिंदल हाऊसजवळ एक आईईडी ठेवला होता. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. तीन गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. संपूर्ण परिसर हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. इस्त्रायली दूतावासाने स्फोटानंतर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.