मेळघाट : मेळघाट येथील हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवासा रेड्डी यांनी या प्रकरणात अटक टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा सत्र न्यायालय अचलपूर येथे अटकपूर्व जामिनासाठी 31 मार्च रोजी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली असून श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून कुठल्याही श्रनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मेळघाटच्या गुगामल वन्यजीवचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पोलिसांनी 26 मार्च रोजी नागपुरातुन पळून जाताना अटक केली असून सध्या तो जिल्हा कारागृहात आहे. मात्र शिवकुमार प्रमाणेच त्याला पाठीशी घालणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षेत्र संचालक श्रीनिवासा रेड्डी जितकेच जबाबदार असल्याने त्यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सामान्य जनतेतून होत आहे. निलंबन झाल्यानंतर पोलीस आपल्याला कुठल्याही श्रणी अटक करतील त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी किंवा अटक करण्यापूर्वी किमान सात दिवस आधी नोटीस देण्यात यावी अशी विनंती श्रीनिवास रेड्डी यांनी न्यायालयात केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आहे.
प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे
दीपाली चव्हाण वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली संरक्षक विनोद शिव कुमार बाला यांच्याइतकेच श्रीनिवास रेड्डी हे देखील या घटनेसाठी दोषी आहेत अशी ओरड राज्यभर होत आहे. आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसं निर्देश मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी दिले आहे.
मुख्य वनसरंक्षक अरविंद आपटे यांनी निर्देशात सांगितले की, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी वेळोवेळी दीपाली चव्हाण यांना मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे कंटाळून शेवटी त्यांनी 25 मार्चला त्यांच्या स्वतःच्या शासकीय निवासस्थानी शासकीय पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्या घटनेला विनोद शिवकुमार दोषी आहेत अशी तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांच्या विरोधात धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 मार्चला विनोद शिवकुमार यांना निलंबितही करण्यात आले. दिपाली यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये नमूद केल्याप्रमाणे विनोद शिवकुमार यांच्याकडून त्यांना छळ होत असल्याची त्यांनी वारंवार क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिली होती.. दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीची श्रीनिवास रेड्डी यांनी वेळीच दखल घेतली नाही आणि काहीच कारवाई केली नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. वनविभाग आणि वन मुख्यालयाकडे त्याबाबतच्या लोकप्रतिनिधी आणि संघटनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.. त्यामुळे विनोद शिवकुमार यांच्या गैर कृत्यावर एक प्रकारे श्रीनिवास रेड्डी यांनी पांघरून घातल्याचे दिसते. त्यामुळे शिवकुमार इतकच श्रीनिवास रेड्डी देखील जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी आपली जबाबदारी वेळेत पार न पाडल्यामुळे दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करावी लागली. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबईचे अप्पर पोलिस महासंचालक व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रज्ञा सरवदे करणार आहेत. त्या 30 एप्रिल पर्यंत चौकशी अहवाल मुख्य वनसंरक्षक यांना सादर करणार आहेत.
दिपाली चव्हाणच्या बदलीसाठी पैसे खाणारा "तो" कोण ?
मेळघाटातील हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. दीपाली यांची मेळघाटात 2014 पासून 2021 पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. आता त्यांना मेळघाटाबाहेर बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांनी सरकारमध्ये कोण्या मंत्र्याला पैसे दिले होते, याचा देखील तपास लागला पाहिजे अशी मागणी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.. मृत दीपालीच्या मेळघाटातील सात वर्षांच्या बदलीनंतर तिला मेळघाटातून बदली हवी होती. यासाठी 'संबंधितांना' (बदलीसाठी पैसे घेणारी यंत्रणा) पैसेही दिले होते. मात्र, पैसे देऊनही बदली होत नसल्याने त्या खचल्या होत्या, असा दावा शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. बदली साठी पैसे घेणाऱ्या त्या नेत्याचे नाव उघड होणे आणि त्यावर देखील कठोर कारवाईची मागणी, शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.