Deepak Kesarkar Meet Devendra Fadnavis : भाजप आणि शिंदे गटामध्ये अत्यंत कळीचा मुद्दा झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्येकोण निवडणूक लढवणार? यामध्ये आता राजकीय तिढा निर्माण झाला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघावर भाजपने दावा करतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपकडून या मतदारसंघातून नारायण राणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाकडून या जागेवरती दावा करण्यात आला आहे.
नारायण राणेंच्या भेटीनंतर केसरकर फडणवीसांच्या भेटीला
रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून तिढा निर्माण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल (28 मार्च) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीनंतर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर सुद्धा आज (29 मार्च) सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार? असाच पश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.
किरण सामंत सुद्धा फडणवीस यांची भेट घेणार
दुसरीकडे दीपक केसरकर यांची भेट झाल्यानंतर या लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. त्यांची उमेदवारी यापूर्वीच घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शिंदे गटातील उमेदवार असणार की त्यांची लढत भाजपच्या नारायण राणेंविरोधात असेल याकडे आता लक्ष असेल.
किरण सामंत हे या मतदारसंघातून निवडणूक लढवली लढवण्यासाठी इच्छुक आहेत. उदय सामंत यांनी या मतदारसंघातून शिवसेनेनं निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती शिंदेंकडील असलेल्या 13 खासदारांपैकी अजूनही पाच जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ हा नेमका कोणाच्या पारड्यात जातो याकडे सुद्धा लक्ष आहे.
भाजपच्या दाव्याने शिंदे गटात नाराजी
अमरावती जागा ही शिंदे गटाच्या हातून गेली आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असावेत, यासाठी शिंदे गटातील नेत्यांचे मत आहे. दुसरीकडे, शिंदे गटातील खासदारांविरोधात नाराजी असल्याचे सर्व्हे दाखवून मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सुद्धा एक प्रकारे शिंदे गटात नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरीची जागा कोणाकडे याचीच चर्चा रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या