Uday Samant : शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवणार आहोत. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.


सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, "कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही. त्यामुळे निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील. 15 फेब्रूवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईनच होतील"


सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु
दरम्यान, राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची  माहिती आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. "विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याची माहिती आज वर्षा गायकवाड यांनी दिली.


...तर भाजपला मत विभाजनाचा फायदा होणार नाही
काँग्रेसने स्वबळाची भाषा करण्यापेक्षा महाविकास आघाडी कशी करता येईल याचा विचार करायला हवा. कारण जर सर्वजण एकत्र येऊन लढलो तर भाजपला मत विभाजनाचा फायदा होणार नाही आणि भाजपला यामुळे रोखता येईल असे मत उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केले. 


 शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासाठी भिवंडीत भाजपचे आंदोलन 
कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत बंद केलेल्या शाळा आणि महाविद्यालये त्वरीत सुरू कराव्यात यावीत, या मागणीसाठी भिवंडी भाजप शहराध्यक्ष संतोष एम. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आहे.


शेट्टी यांच्या या आंदोलनात भाजप शहर पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळांमधील शिक्षक, शाळा व्यावस्थापक सहभागी झाले होते. कोरोना काळात दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असताना तिसऱ्या लाटेत पुन्हा महाविकास आघाडी सरकारने शाळांवर गंडांतर आणत शाळा महाविद्यालये बंद केली आहेत. राज्यात व देशात 15 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू केले असताना कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे कमी असल्याने इतर आस्थापन, बार मॉल हे सर्व सुरू आहे. परंतु, शाळा महाविद्यालये बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटणे  सारखे असून शासनाने तत्काळ शाळा महाविद्यालये 26 जानेवारी पर्यंत सुरू करावीत, अन्यथा भाजप कार्यकर्ते शिक्षक विद्यार्थी यांच्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा संतोष शेट्टी यांनी यावेळी दिला. याबरोबरच पंचायत समितीच्या गटशिक्षणधिकारी नीलम पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.


महत्वाच्या बातम्या