Dhule: एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार आंदोलन सुरू आहे. धुळ्यात देखील 39 व्या दिवशी दुखवटा आंदोलना सुरू आहे. वाहक एसटी कर्मचारी असलेले संजय यशवंत सोनवणे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. एसटी कर्मचारी व नातेवाईकांनी हा संजय यांचा मृतदेह थेट धुळे शहरातील विभागीय कार्यालयात आणून कार्यालयाला घेराव घातला. या घटनेनंतर धुळे शहरात एकच खळबळ माजलीय.


संजय सोनवणे गेल्या 39 दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचारी संपावर आहे. दरम्यान मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.


आज संपा संदर्भात संपात सहभागी झालेल्या कर्मचारी व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून मेस्मा कायदा लावण्याच्या बातमी पाहत असतानाच संजय सोनवणे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि कर्मचाऱ्यांनी संजय सोनवणे यांचा मृतदेह शहरातल्या एसटी विभागीय कार्यालयांमध्ये आणत अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळेस विभागीय कार्यालयात संजय सोनवणी यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड तणावाचं वातावरण झालं होतं. 


एसटी कर्मचारी आणि नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांनी केलीय


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha