Dawood Ibrahim :  काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या बातमीने चर्चेत आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार आणखी एक दणका देणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथील दाऊदच्या मालकीची जमीन आहे. त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात 5 जानेवारी 2024 रोजी जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. 


भारतातून फरार असलेला आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम कासकर हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरीतील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव आहे. दाऊदने तस्करी, खंडणी आणि इतर बेकायदेशीरमार्गाने अमाप संपत्ती जमवली. त्यातून त्याने काही मुंबईसह विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता दाऊदच्या याच मालकीच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. 


रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या  चार जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये चार शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास 20 गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही 8 लाख 8 हजार 770 रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत 21 नोव्हेंबर 2023 रोजी लिलावाबाबत नोटीस काढण्यात आली होती. 
 
दाऊद इब्राहिम कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या. 


या आधीदेखील मालमत्तेचा लिलाव


तीन वर्षांपूर्वीदेखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.  स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून हा लिलाव जिंकला होता.  स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत हा ऑनलाइन लिलाव झाला होता. काते  यांनी 1 कोटी 10 लाख रुपयांना मालमत्ता लिलावात घेतली. या जागेची किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आली होती.