Daund Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक माहिती (daund crime news) समोर आली आहे. पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही घटना घडली आहे. यात एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन लहान मुलांच्या समावेश आहे. या प्रकरणामुळे दौंड तालुक्यातील वरवंड गावात सगळीकडे खळबळ उडाली आहे. यवतचे पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहे. अतुल दिवेकर यांनी आत्महत्या करण्याआधी एक नोट लिहून ठेवल्याची प्राथमिक माहिती आहे. या हत्येमागचं आणि आत्महत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट नाही आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी या कुटुंबियांच्या घरी दाखल झाले आहेत. 


 नेमकं काय घडलं?


पतीने पत्नीची हत्या करून दोन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडली आहे. वरवंड येथील डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. डॉ. अतुल दिवेकर, पल्लवी दिवेकर, अदिवत दिवेकर, वेदांती दिवेकर अशी मृतांची नावे आहेत.
 


दोन लहान मुलांच्या मृतदेहाचा शोध सुरु


डॉक्टर दिवेकर यांनी सुरुवातीला पत्नीचा खून केला त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहिरीत नेऊन टाकले आणि घरी जाऊन आत्महत्या केली. याबाबत त्यापुर्वी त्याने चिठ्ठी लिहिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटस आणि यवत  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन लहान मुलांचा मृत्यूदेह सापडला नसून  त्यांचा शोध  ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस विहिरीचे पाणी काढून सुरू आहे. ही घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही पोलीस तपास करीत आहेत.


 


सुसाईट नोटचा शोध सुरु...


या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली आहे. विहिरीत मुलांचा शोध घेत आहे. त्या विहिरीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या मुलांचा दुपारपासून शोध सुरु आहे. कौटुंबिक वादातून  प्रकार घडला का? किंवा कर्जातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या संदर्भात कोणतीही ठोस माहिती अजून समोर आली नाही आहे.