बीड : सासू-सुनांचे संबंध कसे असतात हे आपल्याला चांगलेच माहित आहे. सासू-सून म्हटलं की भांडण ही खूप सामन्य गोष्ट मानली जाते. सासू-सुनांची घरातील भांडणे अनेकदा पोलिसांपर्यंत पोहोचतात. मात्र याला छेद देत बीडमध्ये सासू-सुनांच्या आदर्श संबंधाचा एक परिपाठ पाहायला मिळाला.


बीड शहरातील काशिनाथ नगरमधील सुंदरबाई दगडू नाईकवाडे यांचे 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले. वृद्ध सासूच्या निधनानंतर पार्थिवाला खांदा द्यायची वेळ आली, त्यावेळी घरातील चारही सुना समोर आल्या आणि सासूच्या पार्थिवाला खांदा दिला.



नाईकवाडे कुटुंबातील सासू-सुनांच्या संबंधांची लोक यापूर्वीही अनेकवेळा चर्चा करत असत. महालक्ष्मीचा सण सासू-सुनांनी एकत्रितपणे मोठ्या आनंदाने साजरा केला होता. प्रथा-परंपरांप्रमाणे पार्थिवाला खांदा द्यायचे काम हे पुरुष मंडळीच करत असतात. या परंपरेला बाजूला सारत सुंदराबाईंवर प्रेम असणाऱ्या सुना स्वतः खांदेकरी बनल्या. याची चर्चा बीडच्या पंचक्रोशीत सुरु आहे.


नाईकवाडे कुटुंबातील लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनिषा जालिंदर नाईकवाडे, मीना मच्छिंद्र नाईकवाडे या चौघींनी त्याच्या कृतीतून सासू-सुनांच्या संबंधाचा आदर्श घालून दिला आहे. तसेच सासूच्या पार्थिवाला खांदा देऊन एक मोठा सामाजिक संदेश सुद्धा दिला आहे.