मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ मुख्यत्वे गुजराती, उत्तर भारतीय ,कोळी,ख्रिश्चन आणि मुस्लिम असा बहुभाषिक बहुसंख्या असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तसा काँगेसचाच बालेकिल्ला आहे. भाजपचा तसा प्रभाव या मतदारसंघात कमीच दिसतो. सध्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँगेसचे असलम शेख आहेत. पण यावेळच्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून लढतील की शिवसेनेत जातील यावर अजूनही संभ्रम आहे. कारण काही दिवसांपूर्वी ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची ही जोरदार चर्चा होती.
मढ, मार्वे, मालवणी,मनोरा ,मालाड पश्चिमचा भाग मिळून बनलेला हा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजेच 3 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे 2 आणि मनसेचा 1 नगरसेवक आहे. या मतदारसंघातुन असलम शेख हे 1997 ते 2002 या काळात समाजवादी पक्षाचे नगरसेवक आणि 2002 ते 2007 या काळात काँगेसकडून नगरसेवक होते. 2009 आणि 2014 या दोन्ही वेळा मतदारसंघातुन ते काँगेसच्या तिकिटावर निवडून आले. 2009 साली त्यांनी भाजपच्या आर. यु. सिंग यांचा 27 हजार 695 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला. 2009 च्या निवडणुकीत असलम शेख यांना 51 हजार635 मते पडलेली तर भाजपच्या आर यु सिंग यांना 23 हजार 940 एवढी मते मिळालेली. तर 2014 विधासभा निवडणुकीत म्हणजेच मोदी लाटेत ही असलम शेख यांनी भाजपच्या राम बारोट यांचा 2200 मतांनी पराजय केला. असलम शेख यांना 56 हजार 574 मते पडलेली तर राम बारोट यांना 54 हजार 271 मते मिळाली.
2014 च्या निवडणुकीत भाजपच्या पराजयाच्या मागे शिवसेना ही असल्याचे बोलले जाऊ शकते. कारण येथील हिंदू मते ही सेना भाजप युती न झाल्यामुळे विभागली गेली त्यावेळी या मतदारसंघातुन सेनेचे डॉ विनय जैन उभे होते. त्यांना 17 हजार 888 मते मिळालेली तर मनसेच्या दीपक पवार यांना 14 हजार 425 मते. राष्ट्रवादी काँगेसचा प्रभाव या मतदारसंघात तसा कमीच आहे.
सध्या या मतदारसंघाकडे पाहता काँग्रेसचे आमदार असून काँग्रेसमध्ये राहतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे काँग्रेसला लवकरात लवकर नवा सक्षम चेहरा या मतदारसंघात शोधावा लागणार आहे. सध्या तसे कोणाचे नावही पुढे येत नाही. शिवसेनेला उत्तर लोकसभा मतदारसंघात आपली ताकद वाढवायची आहे. त्यामुळे ते असलम शेख यांचा पक्षप्रवेश ही करतील पण भाजप सेना युती झाली तर युतीत ही जागा कोणाला मिळणार हाही प्रश्न आहे.
भाजपकडून या मतदारसंघात आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांनीही जोरदार तयारी केली असल्याची चर्चा आहे. तसेच राम बारोट यांच्या नावाची ही चर्चा आहे. त्यामुळे हे तिकीट युतीत नेमके कोणाला जाणार ते येत्या काळात पाहावे लागेल.
1 लाख 51 हजार 759 इतकी या मतदारसंघाची लोकसंख्या आहे. खूप वर्षांपासून मढ, मालवणीतील कोळीवड्यातील मच्छिमारांच्या घरांचे रखडलेले काम, मालवणीतील झोपडपट्ट्यांचे पुनवर्सन, वर्सोवा मढ पुलाचे काम, वाहतूककोंडी अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासारखे अनेक प्रश्न या मतदारसंघात मार्गी लागणे बाकी आहेत. त्यामुळे बहुभाषिक असलेल्या या मतदारसंघात मतदारराजा कोणाला निवडून देतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल :
असलम शेख (काँगेस) : 56, 574
राम बारोट (भाजप) : 54,271
विनय जैन (शिवसेना) : 17888
दीपक पवार (मनसे) : 14,425
मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ | विद्यमान काँग्रेस आमदार पक्षात राहणार की शिवसेनेकडून निवडणूक लढवणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2019 01:35 PM (IST)
सध्या या मतदारसंघाकडे पाहता काँग्रेसचे आमदार असून काँग्रेसमध्ये राहतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे काँग्रेसला लवकरात लवकर नवा सक्षम चेहरा या मतदारसंघात शोधावा लागणार आहे. सध्या तसे कोणाचे नावही पुढे येत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -