Cyrus Mistry Death : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी याबाबतची माहिती दिली आहे.  सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. 2013 ते 2016 या कालावधीत सायरस मिस्त्री यांनी टाचा समूहाच्या प्रमुखपदाची सुत्रे सांभाळली होती.  


सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुंटुंबात झाला. उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते धाकटे सुपूत्र होते. सायरस मिस्त्री यांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून घेतले. त्यांनी 1990 मध्ये लंडन विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग केले आणि त्यानंतर 1996 मध्ये लंडन विद्यापीठातून लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. सायरस मिस्त्री यांच्या पत्नीचे नाव रोहिका छागला आहे.  त्यांना फिरोज मिस्त्री आणि जहान मिस्त्री अशी दोन मुले आहेत. 


सायरस मिस्त्री हे 2006 साली टाटा  समुहाचे सदस्य बनले. 2013 साली वयाच्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. परंतु, 2016 साली वादानंतर मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं.  नुकसानीमध्ये असलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये भागिदारी विकल्याचा मिस्त्रींवर आरोप होता. यानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आलं.  सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. सायरस मिस्त्री यांनी शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर पद देखील भूषवले होते. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मृतांसह जखमींना टाटा समुहाकडून मोठी मदत करण्यात आली होती. ही मदत मिळवून देण्यात सारयस यांचा मोठा वाटा होता.  


सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी 1930 मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला आणि त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील 18.5 टक्के हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. याशिवाय 66 टक्के हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते. 


पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे. SPG समुहामध्ये शापूरजी पालोनजी अभियांत्रिकी आणि बांधकाम, Afcons इन्फ्रास्ट्रक्चर, Forbes Textiles, Gokak Textiles, Eureka Forbes, Forbes & Co, SP Construction Materials Group, SP रिअल इस्टेट आणि नेक्स्ट जेन सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.  


सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून का काढण्यात आले?
मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यामागचे कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही, परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री अध्यक्ष झाल्यानंतर टाटा समूहाचा कोणताही निर्णय मंडळाच्या सदस्यांशी सल्लामसलत न करता आणि कार्यकाळात घेण्यात आला. ज्या प्रकारची वाढ टाटा समूहाने बोर्डाच्या सदस्यांना केली होती ती पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर याप्रकरणी ते न्यायालयात गेले.