Cyrus Mistry : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry ) यांनी 2013 ते 2016 या कालावधीत टाटा समूहाचे (Tata Group) अध्यक्षपद भूषवले होते. व्यावसायिक नात्यांसोबतच मिस्त्री आणि टाटा कुटुंबाचे कौटुंबीक संबंध देखील आहेत. टाटा कुटुंबीयांसोबत मिस्त्री यांचे जवळचे नाते होते. उद्योगपती पालनजी शापूरजी यांना शापूर आणि सायरस मिस्त्री अशी दोन मुले आहेत. तर लैला आणि अल्लू या दोन मुली आहेत. पालोनजी शापूरजी यांची मुलगी अल्लू यांचे लग्न नोएल टाटा यांच्याशी झाले आहे. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. या विवाहामुळे सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कौटुंबीक नाते संबंध वाढत गेले.
पालोनजी मिस्त्री यांनी आयरिश महिलेशी लग्न केले आणि नंतर ते आयर्लंडचे नागरिक झाले. परंतु, त्यांचा बराचसा कार्यकाळ हा मुंबईतच गेला आहे. पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कपड्यांपासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.
कौटुंबीक संबंधांसह मिस्त्री आणि टाटा कुटुंबात व्यावयासिक भागीदारी देखील मोठी आहे. मिस्त्री कुटुंबाने 1936 मध्ये टाटा सन्समध्ये प्रवेश केला. टाटा कुटुंबाचे व्यावसायिक मित्र सेठ एडुलजी दिनशॉ यांनी टाटा सन्समध्ये 12.5 टक्के हिस्सा घेतला होता. 1936 मध्ये दिनशॉ यांच्या मृत्यूनंतर सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी पल्लोनजी मिस्त्री यांनी त्यांचे 12.5 टक्के शेअर्स विकत घेतले. त्याच वर्षी जेआरडी टाटांची बहीण सायला आणि भाऊ दोराब यांनीही त्यांचे काही शेअर शापूरजींना विकले. यामुळे टाटा सन्समधील त्यांची हिस्सेदारी 17.5 टक्क्यांपर्यंत वाढली.
शापूरजींनंतर त्यांचा मुलगा पालोनजी शापूरजी 1975 मध्ये टाटा सन्समध्ये रुजू झाले. 2005 मध्ये सायरस मिस्त्री टाटा सन्समध्ये संचालक म्हणून रुजू झाले. मिस्त्री कुटुंब आणि त्यांच्या कंपन्यांकडे सध्या टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सा आहे. टाटा ट्रस्टनंतर टाटा सन्समध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे शेअरहोल्डर आहेत. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे.
महत्वाच्या बातम्या