Shapoorji Pallonji Group History: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी याबाबतची माहिती दिली आहे. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. सायरस मिस्त्री ज्या शापूरजी पालनजी समूहाचे वारसदार होते त्या समूहाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
फक्त 21 महिन्यात केले मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचे बांधकाम
कंपनीची स्थापना 1865 मध्ये लिटलवुड पालनजी ही भागीदारी फर्म म्हणून झाली. कंपनीला पहिलं काम मिळालं ते म्हणजे गिरगाव चौपाटी येथे फूटपाथ बांधण्याचे. यानंतर कंपनीला मलबार हिल येथे जलाशयाच्या बांधकामाचे काम मिळाले. कंपनीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमही बांधले. तसेच कंपनीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचे देखील बांधकाम केले. त्यावेळी या बांधकामाला 1.6 कोटी खर्च आला होता. 21 महिन्यांत काम पूर्ण केल्याबद्दल मुंबईच्या तत्कालीन राज्यपालांनी कंपनीचे कौतुक केले होते.
पुढे शापूरजी मिस्त्री यांनी 1930 मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला आणि त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील 18.5 टक्के हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे, ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. याशिवाय 66 टक्के हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते.
मिस्त्री कुटुंबाने 1936 मध्ये टाटा सन्समध्ये प्रवेश केला. टाटा कुटुंबाचे व्यावसायिक मित्र सेठ एडुलजी दिनशॉ यांनी टाटा सन्समध्ये 12.5 टक्के हिस्सा घेतला होता. 1936 मध्ये दिनशॉ यांच्या मृत्यूनंतर सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी पालनजी मिस्त्री यांनी त्यांचे 12.5 टक्के शेअर्स विकत घेतले. त्याच वर्षी जेआरडी टाटांची बहीण सायला आणि भाऊ दोराब यांनीही त्यांचे काही शेअर शापूरजींना विकले. यामुळे टाटा सन्समधील त्यांची हिस्सेदारी 17.5 टक्क्यांपर्यंत वाढली.
शापूरजींनंतर त्यांचा मुलगा पालनजी शापूरजी 1975 मध्ये टाटा सन्समध्ये रुजू झाले. 2005 मध्ये सायरस मिस्त्री टाटा सन्समध्ये संचालक म्हणून रुजू झाले. मिस्त्री कुटुंब आणि त्यांच्या कंपन्यांकडे सध्या टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सा आहे. टाटा ट्रस्टनंतर टाटा सन्समध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे शेअरहोल्डर आहेत. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे.
दरम्यान, या समूहाने मुंबईतील काही महत्वाच्या लँडमार्कचेही बांधकाम केले आहे. ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलचा समावेश आहे. शापूरजी पालनजी समूह इंजिनिअरिंग, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा आणि आर्थिक सेवा या 6 प्रमुख विभागांमध्ये कार्यरत आहे. या समूहात 18 मोठ्या कंपन्या आहेत. या समूहाचा व्यवसाय 50 हून अधिक देशांमध्ये पसरलेला असून सुमारे 50 हजार कर्मचारी समूहात कार्यरत आहेत.