मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वादळग्रस्त गुजरातचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर काँग्रेस आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे. पंतप्रधान आज गुजरात दौरा करत आहेत, महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे, त्यांनी महाराष्ट्रातही यायला पाहिजे होतं, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्यात पोहोचले आहेत. वादळाचा सर्वाधिक मारा बसलेल्या दीव भागाला ते भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभावित भागाची हवाई सफर करत ते चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये उना, दीव, जाफराबाद, महुआ या भागांचा पाहणी दौरा पंतप्रधान करतील अशी माहिती आहे. तोक्तेमध्ये गुजरातमधील 27 जणांनी जीव गमावल्याचं वृत्त आहे. 


मोदी महाराष्ट्रात येऊ शकले असते : नवाब मलिक
तोक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना बसला आहे. पंतप्रधान मोदी गुजरात, दीव-दमणचा दौरा करत आहे. ते महाराष्ट्रात येऊ शकले असते. गोव्याहून सुरुवात केली असती तर फक्त अर्धा तास लागला असता. ते भेदभाव करत आहेत का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. केंद्रीय पथक येत नाही हा आमचा अनुभव आहे. केंद्रीय पथक आलं असतं, पंतप्रधानांनी दौरा केला असता तर महाराष्ट्राला मदत मिळण्यास फायदा झाला असता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले. मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि मदत याबाबत चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं.


पंतप्रधानांनी महाराष्ट्रातही यायला हवं होतं : नाना पटोले
"राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवर आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज गुजरात दौरा करत आहेत. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे. त्यांनी इथेही यायला पाहिजे होतं," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.


महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? : सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. आमच्या कोकणातही प्रचंड नुकसान झाले आहे. मग महाराष्ट्र दौऱ्यावर ते का येत नाहीत? महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी विचारला आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारने कोकणवासियांच्या पाठिशी ठामपणे उभं राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील तोक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री येत्या शुक्रवारी (21 मे) कोकणात जाणार असून तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.