नांदेड : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अनेकजण कोरोनाचा सामना करुन कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे काहींनी आई-वडील गमावले, तर काहींनी भाऊ बहिण, काहींनी आपली मुलं गमावली आहेत. कोरोनानं अनेकांची कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्थ केली आहेत. हसत्या खेळत्या संसारांचं होत्याचं नव्हतं झालं. अशीच काहीशी घटना नांदेड शहरातील पार्डीकर कुटुंबियांसोबत घडली आहे. 


नांदेडमधील पार्डीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत घरातील एका डॉक्टरसह चार प्रमुख व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. कुटुंबातील चार व्यक्तींना गमवावं लागल्यामुळं पार्डीकर कुटुंबियांवर आभाळ कोसळलं आहे. 44 वर्षीय डॉक्टर अनिल पार्डीकर यांच्यासह 78 वर्षाचे त्यांचे वडील काशीनाथ पार्डीकर, 70 वर्षीय आई कुसुमताई पार्डीकर आणि 50 वर्षीय मोठा भाऊ अतुल पार्डीकर यांचा कोरोनामुळे एका पाठोपाठ मृत्यू झाला.


 4 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत अवघ्या पंधरा दिवसांत एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा दोन ते तीन दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला आहे. डॉ. अनिल पार्डीकर यांचे नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात स्वतः चे रुग्णालय आहे. दरम्यान रुग्णांना सेवा देत असतांनाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर कोरोनानं टप्प्या टप्प्यानं डॉ. अनिल पार्डीकरांच्या कुटुंबाला विळखा दिला. 


डॉ. अनिल पार्डीकर हे नांदेडमधील नाईक नगर येथे आई, वडील, पत्नी आणि दोन मुले तसेच शिक्षक असलेले मोठे भाऊ अतुल पार्डीकर, त्यांची पत्नी आणि दोन लहान मुली यांच्यासह एकत्र कुटुंबात राहत होते. पण हे हसतं खेळतं पार्डिकर कुटुंब आता  दुःखात बुडालंय. घरातील कुटुंब प्रमुखांचे निधन झाल्यानं मुलावरील वडिलांच छत्र हरवले आहे, तर त्यांच्या पत्नीने आपला जीवनसाथी गमवल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. त्यामुळे आता जीवनात अंधार दिसत असल्याची भावना डॉ. अनिल पार्डीकर यांच्या पत्नी प्रतिभा पार्डीकर यांनी व्यक्त केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :