डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात नेत्याच्या स्वागतासाठी हजारोचा जनसमुदाय रस्त्यावर कोरोनाची धास्ती न घेता उतरला होता. 27 जूनला शहरातील दर्गा बेस मोहल्ल्यात पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षांना कोरोना संसर्गाने ग्रासले असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कुंटुबीयासह व संपर्कात आलेल्या मंडळीची स्वॅब तपासणी केली होती. एकट्या दर्गा बेस मोहल्ल्यातील रुग्ण संख्या नऊ दिवसात 72 वर पोहचली होती. यानंतर स्थानिक प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधित केला आहे.
त्यातच औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध धूत हाॅस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल असलेल्या माजी उपनगराध्यक्षांची प्रकृती खालावल्याची जोरदार अफवा शहरात पसरली होती. या अफवेमुळे त्यांच्या समर्थकांत मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. दरम्यान कोरोनावर मात करुन माजी उपनगराध्यक्ष शहरात परतणार असल्याची माहिती समर्थकांना मिळाली होती.
आंबेडकर चौकात रविवारी रात्री आठ वाजता प्रतिबंधीत क्षेत्राचे नियम व आदेश खुंटीला टांगून हजारोंचा जमाव येथे जमला होता. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसाची कुमक नसल्याने हतबल झालेल्या पोलीसांना गर्दीकडे बघ्याची भूमिका घ्यावी लागली. उपनगराध्यक्षांचे वाहन पुतळा परिसरात दाखल झाल्यानंतर वाहनावर पुष्पवृष्टी करुन जोरदार घोषणाबाजीसह फटाक्यांची आतिषबाजी केली गेली. सदर घटनेची दखल घेत वैजापूर पोलिसांनी माजी उपनगराध्यक्षासह शंभर जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीचं स्वागत करून घेणे हे माजी उपनगराध्यक्षाला चांगलंच महागात पडलं आहे.
जिल्ह्यात 3374 कोरोनामुक्त, 3046 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी 133 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 3374 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 77 तर ग्रामीण भागातील 56 जणांचा समावेश आहे. आज एकूण 217 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6730 एवढी झाली आहे. आजपर्यंत 310 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 3046 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या 217 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 167, ग्रामीण भागातील 50 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 120 पुरूष तर 97 महिला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.