नाशिक : शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आज केली. नाशिकच्या जिल्हा परिषदेत कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी बोंडे म्हणाले की, यापुढे राज्यात विमा कंपनीचा एक अधिकारी कृषी अधीक्षक कार्यालयात बसणार आहे. राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हा दाखल करा असे आदेश कृषीमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच बियाणे आणि खतांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करणार असल्याचे बोंडे म्हणाले.

यावेळी बोलताना बोंडे म्हणाले की, राज्यात जलसंधारण आणि जलक्रांतीचे काम वसंतदादा नाईक यांच्या काळापासून सुरु झाले आहे. शेतीचा विकास दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं मात्र उत्पन्न वाढलं नाही. इतर क्षेत्रातील लोकांचे मात्र उत्पन्न वाढले, असे ते म्हणाले.

देशात पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढीसंदर्भात विचार केला. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना मोकळीक देणे गरजेचे आहे. शेतकरी हा IAS अधिकाऱ्यांपेक्षा हुशार आहेत, असेही ते म्हणाले.

कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम सक्षमपणे करणार असल्याचेही ते म्हणाले.

कृषी दिनानिमित्त शेतमाऊली सन्मान सोहळा   

वाशिम : जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात शेतमाऊली सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माता-भगिनींचा सन्मान शेतमाऊली सन्मान सोहळ्याच्या अंतर्गत  करण्यात आला. जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 12 महिलांना साडी चोळी देवून जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख आणि वाशीम कृषी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.