Crime News : नातेवाईक झोपेत असल्याची संधी साधत धावत्या एक्स्प्रेसमध्ये एका 6 वर्षाच्या चिमुकीलवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील बानापूर ते तीनराणी दरम्यान ही घटना घडली आहे. मुलीने आरडाओरड केल्याने जागे झालेल्या पीडितेच्या आईने प्रवाशांच्या मदतीने  नराधमाला पकडून चोप दिला. तब्बल 12 तास या आरोपीला त्यांनी पकडून ठेवलं होतं. दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेबाबत  बदलापूर येथे राहणाऱ्या पतीला माहिती दिली, त्यांनी याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना तात्काळ माहिती दिली. मंगळवारी दुपारी एक्स्प्रेस कल्याणला पोहचताच कल्याण रेल्वे पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतलं. सोनू  प्रजापती असे या नराधमाच नाव आहे.


दरम्यान ही मध्यप्रदेशमधील इटारसी रेल्वे पोलीस ठाण्याच्य हद्दीत घडल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीला इटारसी पोलिसाच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेमुळे मात्र मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे आणि शासनाकडून महिलाच्या सुरक्षेची हमी दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र महिलाच्या सुरक्षा अद्याप अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.


सदर पिडीत मुलगी आई, आजी, दोन भाऊ आणि एका बहिणीसह 14 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास उत्तरप्रदेश बधोही मधून काशी एक्स्प्रेसने बदलापूर मधील आपल्या घरी  निघाले होते. 15 तारखेला मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक्स्प्रेस मध्यप्रदेशमधील बानापूर स्थानक सोडलं. चिमुकलीच्या नातेवाईकांची झोप लागली. याच वेळी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सोनू प्रजापती याची नजर या चिमुकलीवर पडली. सगळे झोपेत असल्याची संधी साधत सोनुने या 6 वर्षाच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला. घाबरलेल्या पीडित मुलीने आरडा ओरड केला, त्यामुळे या पीडितेच्या नातेवाईकांसह तिच्या आईला जाग आली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तत्काळ शोधा शोध करत या नराधमाला पकडलं.


याच दरम्यान आजूबाजूच्या प्रवाशांनी धाव घेत सोनूला पकडून बेदम चोप दिला. पहाटे पासून दुपारपर्यंत तब्बल 12 तास या नराधमाला प्रवाशांनी पकडून ठेवले होते. पीडितेच्या आईने दुपारच्या सुमारास या घडल्या प्रकाराबाबत बदलापूर येथील घरी असलेल्या पीडितेच्या  वडिलाना माहिती  दिली. वडिलांनी तत्काळ  कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत सदर घटनेची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, पंढरीनाथ कांदे यांच्या पथकाने  क्षणाचा विलंब न लावता कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचला. काशी एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात पोचताच पोलिसांचे पथक एक्स्प्रेस मध्ये घुसले व सोनूला ताब्यात घेतलं. मात्र हा गुन्हा मध्यप्रदेश मधील इटारसी रेल्वे पोलिसाच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी या चिमुरडीची वैद्यकीय तपासणी करत गुन्हा दाखल करून आरोपीला इटारसी पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.