Nanded School : घरफोडी असो की रस्ता अडवून केलेली लूटमार, किंवा मंदिरातील दानपेटी चोरीला जाणे, अन्यथा धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणे अशा विविध स्वरुपाच्या चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या-ऐकल्या असतील. मात्र ज्या ज्ञान मंदिरातून हजारो विद्यार्थी ज्ञान घेऊन आपले भवितव्य घडवितात, असे ज्ञान मंदिर अथवा शाळा चोरीला गेल्याचे तुम्ही कधी ऐकलं आहे का? नाही ना. मात्र हो हे खरं आहे. नांदेड जिल्ह्यातील इस्लापुर येथे चक्क शाळाच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी इस्लापुर जिल्हा परिषद शाळेच्या टिन पत्र्यांसह, खुर्च्या-टेबल, खिडक्या, दरवाजे आणि चौकट असा एकूण 1 लाख 64 हजार रुपयांचे साहित्य चोरले आहे.
किनवट सारख्या आदिवासी बहुल भागातील इस्लापूर येथील जिल्हा परिषदेत ही एकमेव शाळा होती. या शाळेच्या काही खोल्यांची अवस्था जीर्ण झाली होती. या शाळेतील सर्व साहित्य एका रूममध्ये ठेवण्यात आले होते. मात्र ही शाळा गेल्या एक ते दिड वर्षापासून कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करीत बंद ठेवण्यात आली होती. जी आता ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग कमी झाल्यानंतर सुरू करण्यात आली होती. मात्र शाळेचे गेट उघडून आत प्रवेश करताच शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मोठा धक्काच बसला. कारण चोरट्यांनी शाळेतील सर्वच साहित्य चोरून नेले होते.
दरम्यान, या शाळेचे मुख्याध्यापक गजानन कदम व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुष्मा पाटील यांनी शाळेतील एकूण 1 लाख 64 हजार 400 रुपयाचे साहित्य चोरून नेल्या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून अज्ञात चोरांचा शोध घेत आहे.
हेही वाचा :
- मातोश्रीमधील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा ट्वीटमधून गौप्यस्फोट
- Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, 202 नवे रुग्ण, तर 365 कोरोनामुक्त
- मैदानात हरायचं आणि शेमड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं, नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha