मुंबई : महिला अत्याचाराची एखादी तक्रार आल्यावर महिला पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून देणं अपेक्षित असतं. पण पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील एका महिला पोलीस अधिकारीने चक्क अन्याय करणाऱ्यालाच लाच मागितली आहे.  त्याप्रकरणी संबंधित पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळूंकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने अटक केली आहे. तर सहाय्यक पोलीस फौजदार अशोक देसाईने स्वतःची एसीबीच्या जाळ्यातून सुटका करत लाचेसह पसार झालाय. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखाची लाच मागितली होती. 


पिंपरी चिंचवडमधील एक तरुण आणि तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकले होते. अनेक महिन्यांपासूनच्या या नात्याने प्रेमापलीकडचे संबंध गाठले होते. एकत्रित आयुष्य जगायचं हे ठरवून विवाह बंधनात अडकायचं हे देखील दोघांनी ठरवलं होतं. मात्र नंतर तरुणाने पलटी मारली होती, त्यामुळंच पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. सांगवी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितेने घडला प्रकार सांगितला. मग पोलिसांनी तरुणाला बोलावून घेतलं. प्रकरण तापू लागलं, तरुणाला तुरुंगाची हवा खायची भीती वाटू लागली. त्यामुळं यावर तातडीनं पडदा टाकणं गरजेचं होतं, त्यांनी थोडा वेळ ही मागितला. दोघांनी एकमेकांशी बोलणं केलंय असं भासवत पोलिसांना प्रकरण मिटल्याचं सांगितलं. पण थोडी धुसफूस सुरूच होती. 


पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांनी याचा फायदा घ्यायचं ठरवलं. पीडित तरुणीशी लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाला त्यांनी बोलावून घेतलं आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल, तर एक लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी त्यांनी केली. आता जर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तर मोठी बदनामी होणार, त्यामुळं तरुणाला काय करावं हे कळत नव्हतं. शेवटी त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीकडे तक्रार केली. आलेल्या तक्रारीची 25 आणि 26 नोव्हेंबरला एसीबीने पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार तरुणाने पोलीस उपनिरीक्षक सोळुंके यांनी केलेल्या मागणीची बोलणी सहाय्यक पोलीस फौजदार देसाईंनी केली.


 एक लाखात तडजोड झाली आणि शेवटी सत्तर हजार रुपयांना सौदा झाला. हीच लाच औंध जिल्हा रुग्णालयासमोर घ्यायचं ठरलं, त्यानुसार एसीबीने तिथं सापळा रचला. तक्रारदाराकडून सत्तर हजाराची लाच घेण्यासाठी सहाय्यक पोलीस फौजदार देसाई ही तिथं पोहचले आणि ती रक्कम स्वीकारली. त्यावेळी देसाईला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचून बसलेल्या एसीबी पथकाने त्यांना घेरलं, पण देसाईंनी त्यांच्याकडची दुचाकी बेदरकारपणे चालवीत पथकाला धक्का देऊन रकमेसह पोबारा केला. दुसरीकडे पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंकेना एसीबीने अटक केली. तर देसाईंच्या शोधासाठी पथकं हा रवाना केली आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :


सावध व्हा! बिटकॉइन गुंतवणुकीत संगणक अभियंत्याला 37 लाखांचा गंडा


फक्त टेलरमार्कवरून खुनाचा 12 तासात उलगडा, कळवा पोलिसांची कामगिरी


जाहिरातीला भुलले अन् गंडले... तीनशेची थाळी लाखाला! शाही भोज थाळीची जाहिरात पचली नाही!