नागपूर : नागपुरात रोज सरासरीने एक हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित आढळत असताना आणि रोज सरासरीने दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत असताना ही नागपूरकर मास्क लावायला तयार नाही. एबीपी माझाने केलेल्या रियालिटी चेक मध्ये मोठया संख्येने नागपूरकर मास्क न लावलेलेच आढळले. विशेष म्हणजे प्रत्येकाचे मास्क न लावण्याची जगावेगळी कारणं आहेत. काहीचे तर्क तर असे आहेत की जागतिक आरोग्य संघटनाही त्यासमोर नतमस्तक होईल. असे असताना ही नागपूर महापालिका मास्क न लावणाऱ्यांविरोधात थातुरमातुर कारवाई करत आहे. त्यामुळे एका बाजूला नागरिकांवर अनेक बंधने लावणारी महापालिका मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर मेहरबान का आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूरच्या कोणत्याही बाजारपेठेत गेल्यावर मास्क न लावलेले नमुने पाहायला मिळतात. नागपूर जिल्ह्यात काल १ हजार ३३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी एकट्या नागपूर शहराचा वाटा १ हजार ४९ रुग्णांचा आहे. असे असताना ही नागपूरकरांचे मास्क न लावण्याचे जगावेगळे कारण आहेत. मास्क न लावणाऱ्यांना एबीपी माझाने प्रश्न विचारताच अशी कारण नागपूरकरांनी पुढे केली की खुद्द WHO ही घायाळ झाल्या शिवाय राहणार नाही. काहींना कुठे ही कोरोना आहे असे वाटत नाही. पंतप्रधानांच्या रॅलीत कोरोना नाही, शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोरोना ही नाही, मग नागपुरातच कोरोना कसा असा या मास्क न लावणाऱ्या नागपूरकरांचा सवाल आहे. तर काहींचे आताच नाश्ता केला, आताच चहा प्यायलो म्हणून मास्क लावलेला नाही असे उत्तर तयार असतात.
फोनवर बोलताना मास्क काढायची गरज नाही. मात्र, काही नागपूरकरांना फोनवर बोलताना मास्क नकोय. तर एका किराणा दुकानदाराने तर मास्क लावल्याने चक्क नाकातून घाम येते असे सांगत दुकानाच्या शटर सारखे मास्क ही वरखाली करत राहतो असे जगावेगळे उत्तर दिले. तर काहींनी तर ते कोरोनाला पाहून जेवढे घाबरत नाही तेवढे ते माझाच्या कॅमेऱ्याला पाहून घाबरले आणि चक्क पळ काढला. तर काहींनी कॅमेरा पाहून त्वरित मास्क घालत मग मास्क का लावले पाहिजे असे तत्वज्ञान इतरांसाठी दिले. तर काही महाभाग सकाळी फिरायला जाताना मास्क कशाला शुद्ध हवा कशी मिळेल असे सांगतात इतर सर्वांनी मात्र मास्क घालावे यावर चक्क लांबलचक लेक्चर दिले.
मास्क न लावणारे काही नागपूरकर माझाचा केमेरा पाहून असे लाजले की त्यांनी पळच काढला. तर काहींनी तापमानाचं कारण पुढे केला. एक महाभाग तर पाठीत जखम झाल्याने दुखतोय म्हणून मास्क लावत नसल्याचा कारण पुढे केलं. काही वृद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून गर्दीत मास्क विना फिरताना आढळले. आणि माझाने प्रश्न विचारताच माझी तब्येत बरी नाही डॉक्टरकडे जातोय असे कारण पुढे केले. मात्र, डॉक्टर सांगतात मास्क लावा असे सांगताच खिशातून मास्क काढून लावले.
आता नागपुरात नागरिक मास्कचा नियमांचा सर्रास उल्लंघन करत असल्याचे तुम्ही पाहिल्यानंतर नागपुरात कोरोना का पसरतोय हे तुमच्या लक्षात आलेच असेल. आता जरा खुद्द महापालिका मास्क न लावणाऱ्याविरोधात काय कारवाई करत आहेत हे ही पहा.
नागपुरात कोरोना बाधित रुग्ण आणि मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई
१ मार्च ८७७ रुग्ण ६ मृत्यू १२२ लोकांवर मास्क कारवाई
२ मार्च ९९५ रुग्ण १० मृत्यू १३३ लोकांवर मास्क कारवाई
३ मार्च ११५२ रुग्ण ६ मृत्यू १०९ लोकांवर मास्क कारवाई
४ मार्च १०७० रुग्ण ८ मृत्यू १२९ लोकांवर मास्क कारवाई
५ मार्च १३९३ रुग्ण ९ मृत्यू १२५ लोकांवर मास्क कारवाई
६ मार्च ११८३ रुग्ण ९ मृत्यू ११५ लोकांवर मास्क कारवाई
७ मार्च १२७१ रुग्ण ७ मृत्यू ८८ लोकांवर मास्क कारवाई
८ मार्च १०३८ रुग्ण ११ मृत्यू ११६ लोकांवर मास्क कारवाई
९ मार्च १०४९ रुग्ण ६ मृत्यू १५० लोकांवर मास्क कारवाई
त्यामुळे एका बाजूला नागपुरात रोज सरासरीने एक हजारच्यावर कोरोना बाधित आढळत असताना महापालिका मात्र मूठभर लोकांवर मास्क न घातल्या संदर्भात कारवाई करत पाट्या टाकण्याचे काम करत आहे... त्यामुळे एका बाजूला नागपूर महापालिका कोररोनाचा वाढता संक्रमण थांबवण्यासाठी विविध निर्बंध लावत आहेत. शहरात 14मार्च पर्यंत अनेक बाबींवर बंधने घालण्यात आली आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला महापालिका कोरोना रोखण्यासाठी सर्वात प्राथमिक बाब म्हणजेच मास्क संदर्भात कारवाई करण्यास इच्छुक नाही असेच चित्र सध्या नागपुरात दिसत आहे.