Cow Milk Price : राज्य सरकारनं दूध (Milk) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान 34 रुपयांचा दर (Cow Milk Price) देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे विखे पाटील म्हणाले.


राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुधाला प्रतिलीटर 34 रुपयांचा दर देण्याची मागणी करण्यात आली आहे. सहकारी आणि खासगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चितीसाठी शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली होती. सहकारी आणि खासगी दुग्ध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या या समितीने शासनास शिफारस केली होती. त्यानुसार राज्यात गायीच्या दुधासाठी (3.5/8.5) गुणप्रतिकरिता किमान खरेदी दरास मान्यता देतानाच दर विनाकपात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा करणे अभिप्रेत राहिल, असा निर्णय शासनाने घेतल्याचे विखे-पाटील म्हणाले.


दरमहा शासनास अहवाल सादर करावा


दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर तीन महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार तीन महिन्याच्या आतही समितीने दूध दराबाबत शासनास शिफारस करावी. किमान दूध दराच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिली आहे.


अडचणींचा सामना करणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याची भूमिका राज्य सरकारची होती. यासाठी राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेवून समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 34 रुपये दर देण्याची शिफारस केली. त्यानुसार राज्य सरकारने आता गाईच्या दुधाकरिता किमान 34 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा शासन आदेश काढला असल्याचे विखे पाटील म्हणाले. याची अंमलबजावणी करण्याबाबतही सुचना देण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sadabhau Khot : एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवावा, सदाभाऊ खोतांची मंत्री विखे पाटलांकडे मागणी