Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणीच पाऊस (Rain) पडत आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस (Rain) नसल्या,नं बळीराजा चिंतेत आहे. पावसाळा सुरु होऊन दीड महिना झालं तरी समाधनाकारक पाऊस पडला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत असून, अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तिथं दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह उपनगर, ठाणे परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पाळगर, परभणी या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावलीय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 4 दिवसात म्हणजे 16 ते 19 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
परभणीत जोरदार पाऊस
अनेक दिवसांच्या खंडानंतर परभणी शहरात जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं शहरातील वसमत रस्ता शिवाजी चौक गांधी पार्क आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक दिवसानंतर झालेल्या या जोरदार पावसामुळं परभणीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात मात्र हा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भाग कोरडा ठेवून शहरात हा पाऊस झाला आहे. त्यामुळं अजूनही जिल्ह्याला सर्वदूर पावसाची आवश्यकता आहे.
पालघर जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला वेग
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टरवरती भात शेती केली जाते. सध्या हळव्या भात लावण्या सुरू असून त्या 50 टक्के पूर्ण झाल्या आहेत. तर गरव्या भाताच्या लावण्याही शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत.
शेतकरी चिंतेत
यावर्षी जुलै महिना अर्धा संपला पाहिजे असा पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतेत सापडलेला आहे. कारण पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या फक्त पंधरा ते सोळा टक्के इतकाच पाऊस झाल्याने शेतातील पिके संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी उभी पिके सुकत आहे तर ही पिके वाचवण्यासाठी बळीराजा स्पिंकलरच्या साह्याने या पिकांना पाणी देत आहे. अपेक्षीत असा पाऊस न झाल्याने पिकांची वाढसुद्धा खुंटली आहे. तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 60 टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट ओढवले आहे. यंदा पाऊस नसल्याने मराठवाड्यात अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुर्ण जुन महिना गेला. जुलै अर्धा लोटला तरी पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं मराठवाड्यात तब्बल 44 टक्के पेरण्या बाकी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्या देखील पावसाअभावी हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: