नांदेड : कोरोनावर प्रभावशाली म्हणून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं लस बनवली. सीरमच्या कोव्हिशील्ड लशीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी देखील मिळाली आहे. मात्र या लशीच्या CoviShield या नावावर नांदेड येथील क्‍युटीस बायोटीक या कंपनीने हरकत घेतली होती. त्या अनुषंगाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याला सीरमकडून न्यायालयाच्या कार्य क्षेत्रावर (territorial Jurisdiction) आक्षेप घेतला होता. हे प्रकरण फक्त व्यावसायिक न्यायालयात (commercial court) चालू शकते असा युक्तिवाद केला होता. अपेक्षेप्रमाणे क्‍युटीस बायोटेक हा वाद नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात घेऊन जाईल असा अंदाज बांधून सीरमने नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात कॅव्हेट टाकून ठेवली होती. परंतु क्‍युटीस बायोटेकने थेट पुण्याचे न्यायालय गाठले आहे.


'कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही "सीरम'च्या आधी सुरवात केली आहे. त्यामुळे "सीरम'ने लसीची निर्मीती करावी, मात्र तिचे नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे. "कोव्हिशिल्ड' ला परवानगी देण्यासाठी अर्ज केल्यानंतर सीरमकडून "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करीत असल्याची माहिती क्‍युटीसला मिळाली.


ट्रेडमार्क मिळण्यासाठी सीरमच्या आधी अर्ज, क्युटीसचा दावा
क्‍युटीस कंपनीनं दावा केला आहे की, आम्ही 29 एप्रिल 2020 रोजी "कोव्हिशिल्ड' हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी रजिस्टर कार्यालयाकडे अर्ज केला होता. सीरमने त्यानंतर म्हणजे तीन जून 2020 रोजी अर्ज केला आहे. ट्रेडमार्कला अर्ज केल्यानंतर आम्ही कोरोनाशी लढा देण्यासाठी कोविशील्ड नावाने विविध उत्पादने 30 मे पासून बनवायला व त्याची विक्री करण्यास सुरवात केली आहे. हे सर्व उत्पादन "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कखाली उत्पादित व विक्री केली जात आहेत. मात्र आता "सीरम'ने त्यांची लस "कोव्हिशिल्ड' या नावाने बाजारात आणण्याची तयारी केल्याने ट्रेडर्स आमची उत्पादने घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसत आहे. या सर्वांचा विचार करून "सीरम'ने त्यांच्या लशीचे नाव बदलावे, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. अॅड. आदित्य सोनी यांच्यामार्फत "क्‍युटीस'ने ही याचिका दाखल केली आहे.


पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी
"कोव्हिशिल्ड' हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी "क्‍युटीस बायोटीक' आणि "सीरम' या दोनही कंपन्यांनी अर्ज केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीला हा ट्रेडमार्क देण्यात आलेला नसून त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांनी आपली उत्पादने "कोव्हिशिल्ड' या नावाने उत्पादित करण्यास सुरवात केली आहे. "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही आधी सुरवात केली आहे. तसेच त्याबाबतच अर्ज देखील आधी केला आहे. त्यामुळे "सीरम'ने "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करून लस बाजारात आणली तर त्यातून होणारा नफा "क्‍युटीस'ला द्यावा. कारण तशी तरतूद "ट्रेडमार्क ऍक्‍ट 1999' मध्ये आहे, अशी माहिती "क्‍युटीस'चे वकील सोनी यांनी दिली. क्‍युटीस'ने दाखल केलेल्या दाव्यानंतर न्यायालयाने "सीरम'ला नोटीस बजावली आहे. तुमच्या विरोधात दावा दाखल झाला आहे. त्यात ट्रेडमार्क वापरण्याबाबत हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत मनाई आदेश का देऊ नये? यावर तुमचे म्हणणे मांडा असे त्या नोटिशीत नमूद आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.


क्‍युटीसच्या मागण्या काय आहेत
सीरमने लसीचे नाव बदलावे
कोव्हिशिल्ड ट्रेडमार्कचा वापर करून मिळवलेला नफा क्‍युटीसला द्यावा
कोव्हिशिल्ड नावाशी मिळते-जुळते नाव सीरमने वापरू नये
सीरमने कोव्हिशिल्ड ट्रेडमार्क मिळण्याबाबत केलेला अर्ज परत घ्यावा