Corona Vaccine वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचीच दहशत साऱ्या जगावर आणि देशावर पाहायला मिळालं. दर दिवशी सातत्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणांपुढचं आव्हान होऊन उभी राहिली. पण, आता या विषाणूची प्रतिबंधात्मक लस देशात दाखल झाल्यामुळं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Coronavirus Vaccine देशभरातील विविध भागांमध्ये कोरोना लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा भागांमध्ये कोरोनाची लस निर्धारित ठिकाणांच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहेत. प्रत्येक राज्यात, शहरात या लसीचं मोठ्या उत्साहात आणि तितक्यात सकारात्मकतेनं स्वागत केलं जात आहे. पण, बेळगावकरांचं स्वागत यात बाजी मारुन गेल्याचं दिसत आहे.
कोरोना लस, म्हणजे सध्याच्या घडीला खऱ्या अर्थानं एका मोठ्या संकटातील तारणहारच. याच तारणहार लसीच्या येण्यानं बेळगावमध्ये लसीचं जंगी स्वागत करण्यात आलं. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सीरमच्या कोविशिल्ड लस आणणाऱ्या वाहनाने कर्नाटक हद्दीत प्रवेश केला. वाहनानं हद्द ओलांडताच पोलीस बंदोबस्तात लस आणणारं हे वाहन बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो येथे आणण्यात आलं. तिथं सुवासिनींनी लस आणलेल्या वाहनाची आरती केली. आरती केल्यानंतर वाहनातील लसी तेथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आल्या.
बरं स्वागताचा हा उत्सह इतक्यावरच थांबला नाही. लस येण्याच्या आनंदात इथं बँडबाजाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं लस, वाजत गाजत आली असं म्हणायला हरकत नाही. कोरोनावर मात करण्यासाठीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सध्याच्या घडीला 1 लाख 47 हजार लसी बेळगावात आल्या आहेत. दाखल झालेल्या या लसी आता आठ जिल्ह्यांना पुरवण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत एकट्या बेळगाव जिल्ह्यासाठी 37 हजार लसी आल्या आहेत. केंद्रानं आखलेल्या वेळापत्रकानुसार 16 तारखेपासून इथंही प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार.