मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते. मुंबईसह काही ठिकाणी लसीकरण मोहिम थांबली असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कालच केली होती. 


मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो वॅक्सिनेशन सेंटरचा साठा संपला!
बीकेसीमध्ये पाच हजार लोकांना लस दिली जाते पण आज फक्त 160 जणांना लस देण्यात आली, अशी माहिती आमदार झीशान सिद्दीकी यांनी दिली आहे.  मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो वॅक्सिनेशन सेंटरला केवळ 160 लसीचे डोस शिल्लक होते. माहिम येथील महिला स्पेशल लसिकरण केंद्रातला साठा संपला आहे तर  मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये नागरिकांची लस घेण्यासाठी झुंबड उडाली होती.  ज्या ठिकाणी लस उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांनी लस संपेल या भीतीने गर्दी केलेली पाहायला मिळालं. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात सकाळ पासून शेकडो नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी रांग लावली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. 


आज रात्री उशिरापर्यंत 1 लाख 80 हजार लस उपलब्ध होईल - महापौर किशोरी पेडणेकर


महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे की, आज रात्री उशिरापर्यंत 1 लाख 80 हजार लस उपलब्ध होईल अशी माहिती मिळाली आहे.  या लसींचं नियमानुसार वाटप होईल.  दुसरा डोस ज्यांचा शिल्लक आहे त्यांना दिला जाईल. त्या म्हणाल्या की, 2- 3 दिवसात लसीकरण पूर्ववत होईल.  ज्यांना मेसेज येईल त्यांनी लसीकरण केंद्रावर यावे.   मेसेज न आलेल्या लोकांनी गर्दी करू नये, असंही त्या म्हणाल्या.  


Maharashtra Corona Vaccine Shortage : लसटंचाई... अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद, कोणत्या जिल्ह्यात किती साठा शिल्लक? वाचा सविस्तर


कोरोना लस संपल्याने दुपारीच लसीकरण बंद
बीडच्या अंबाजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना लसीकरण चालू होते. मात्र आज 100 लस दिल्यानंतर दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान लसीचा साठा संपल्याने बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. रोज किमान सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय मध्ये कोरोना लसीकरण चालू असते मात्र आज दुपारी साडेबारापर्यंत उपलब्ध असलेल्या शंभर जणांना लस दिल्यानंतर लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना लस न घेताच घरी परतावे लागले.


Maharashtra Corona Vaccine Row | लस वाटपात उत्तर प्रदेश, गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? : राजेश टोपे


नवी मुंबई , पनवेलमध्ये डोस संपल्याने लसीकरण केंद्र बंद


नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातीस लसींचा डोस संपल्याने कालच लसीकरण बंद करण्याची वेळ दोन्ही शहरांवर आली आहे. नवी मुंबई मध्ये दिवसाला 8 हजारपर्यंत लसीकरण केले जाते. आतापर्यंत 1 लाख 42 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. शहरात 41 ठिकाणी लसीकरण केंद्र असून लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. सद्या फक्त 4 हजार लसींचे डोस शिल्लक होते. आज रात्रीपर्यंत हाही संपणार असल्याने संपूर्ण शहरातील लसीकरण बंद होणार आहे. दुसरीकडे पनवेल महानगर पालिकेकडेही लस उपलब्ध नसल्याने पनवेलमधील लसीकरण बंद पडले आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प


चंद्रपूर : जिल्ह्यात 31 लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प, कोवीशिल्ड व कोवॅक्सिन लसींचा साठा संपल्याने लसीकरण बंद, 96 पैकी 65 केंद्रांवर अजून लसीकरण सुरू तर 31 ठिकाणी बंद, जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लागले लसीकरण बंदचे फलक, लवकरच लसींचा साठा येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. आतापर्यंत दीड लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. 
 
सातारा, सांगलीतही लसीकरण थांबलं


सातारा जिल्ह्यातील कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. एका आठवड्यात 90 हजार 142 जणांना लस देण्यात आली. सध्या किमान 27 ते 30 हजार जणांचं लसीकरण केलं जात होतं. सांगली जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण परवा संध्याकाळपासून बंद आहे. परवा पर्यंत एकूण 2 लाख 60 हजार लोकांचे लसीकरण झाले. सध्याच्या घडीला लसीचा एकही डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद झालं आहे. नवीन लसीचा साठा आज मिळेल असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.